रत्नागिरी : शहरापासून १० किलाेमीटर अंतरावर असलेल्या सड्ये येथील तरुणांनी सलग तिसऱ्यावर्षी नरक चतुर्दशी दिवशी कातळशिल्प शोधयात्रा काढली. या शोधयात्रेतून सड्ये-वाडाजूनच्या सड्यावर तब्बल तीस ठाशीव, सुस्पष्ट कातळशिल्पांचा समूह आढळला. छोटी, मध्यम आणि मोठाली अशी एकूण १० रेड्यांची पावलं, १० मानवाची पावलं, २ मोठाल्या चाव्याकृती आकृत्या, २ प्राणी, १ मडके या आकृतींचा खजिना यावेळी सापडला.सड्येतील तरुण मंडळी दरवर्षी दिवाळीनिमित्त पदयात्रा काढतात. यावर्षीची पदयात्रा वाडाजून सड्यावरील ‘रेडेबावलं’ या गूढकथांनी प्रसिध्द असलेल्या ठिकाणी काढली होती. या तरुणांची सकाळी ९ वाजता सड्ये देवस्थान येथून ही पदयात्रा सुरू झाली. यावर्षीच्या पदयात्रेचे मार्गदर्शन रानमाणूस आत्माराम धुमक यांनी केले. रानवाटा, गावांच्या सीमारेषा, जमीन मोजणीच्या जुन्या ऐरणी, रानटी औषधी झाडे आणि त्यांचे उपयोग, प्राचीन बांधीव घाट्या, कातळशिल्पे आणि त्यामागच्या दंतकथा याबाबत त्यांनी माहिती दिली. पदयात्रा यशस्वी करण्यासाठी पदयात्रेचे संकल्पक अनंत धुमक, अमोल पालये, मारुती धुमक यांनी मेहनत घेतली. पदयात्रेत सूरज माने, निखिल पालये, रोशनी पालये, तेजस्विनी पालये, वेदिका तांबे, तनिष्क लोखंडे, आत्माराम धुमक सहभागी झाले होते.
याठिकाणी रेडे किंवा घोडा यांच्या पायांचे ठसे कोरलेले दिसले. मोठ्या पावलांची लांबी ८ फूट आणि रुंदी ६ फूट इतकी आढळली. एका पावलाशेजारी ‘भाला’ या शस्त्राची आकृतीही कोरलेली हाेती. याशिवाय १० मानवाची पावलंही आढळली. मानवाच्या या पावलांची दिशा पश्चिमेकडे जाताना दिसतात. याशिवाय तीन प्राणीही चितारलेले आहेत. तिन्हीही प्राणी लंबाकृती आहेत. एकाचे तोंड निमुळते आहे. त्यांच्या डोळ्यांची खोबणी खोलगट आहे.एक प्राणी विमानाच्या आकृतीसारखा आहे. एक माशासारखा प्राणी आहे. एक शंखाकृती आकृतीही आहे. एक मडकेही चितारलेले आहे. आकृत्यांमध्ये दोन आकृत्या या ‘चावी’ आकाराच्या आहेत. दोन्ही चाव्या मोठाल्या आहेत. चावीचा पुढील काडीचा भाग ६ फूट लांब आहे. चावीचा मागील भाग आयताकृती आहे. हा आयत ४ फूट लांब आणि २ फूट रुंद आहे. या आयताच्या मध्यभागी २ चौकोन असून, त्यामध्येही काही आकृतीबंध काढण्यात आलेले आहेत. अशी एकूण ३० चित्रे दृष्टीपथात आली