रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कापडगाव (ता. रत्नागिरी) येथील माता - पालकांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान केले. शाळेचे मुख्याध्यापक मनोजकुमार खानविलकर यांच्या प्रेरणेने ध्वजस्तंभासमोर रंगमंच उभारला. त्यांनी भराव करुन सपाटीकरण करण्यासाठी संपूर्ण दिवसभर श्रमदान केले व समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला.संपूर्ण दिवसभर चाललेल्या या श्रमदानात सत्तावीस माता-पालकांनी सहभाग घेतला. दगड आणि माती टाकून रंगमंचाचे सपाटीकरण केले. यासाठी लागणारी माती धर्माजी रत्नू पेजे यांनी मोफत देऊन शाळेला सहकार्य केले. या श्रमदानासाठी माता पालक संघाच्या उपाध्यक्ष संजीवनी विश्वास पाडावे, पालक - शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सायली संतोष पेजे यांच्यासह सर्व माता-पालक तसेच ज्येष्ठ महिला शारदा यशवंत कांबळे व पार्वती संभाजी पेजे यांनीही सक्रिय सहभाग घेतला.माता व पालकांनी स्वत: पुढाकार घेत रंगमंच भरावासाठी केलेल्या या श्रमदानाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश शिंदे, कापडगावचे माजी सरपंच अनिल पाडावे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन माता - पालकांचे अभिनंदन केले. कापडगाव शाळेसाठी रंगमंच उभारणी करून यानिमित्त सर्वांसमोर नवा आदर्श घालून दिला. गेले अनेक दिवस या भागात रंगमंच उभारणी व्हावी, यासाठी शिक्षक प्रयत्न करीत होते. आता माता - पालकांनी हा विषय हाती घेतल्यानंतर तो पूर्ण करण्यात आला आहे. माता-पालक वर्षातून दोनवेळा शालेय परिसर स्वच्छ करण्यासाठी नेहमीच श्रमदान करीत असतात. त्यांच्या सातत्यपूर्ण अशा सहकार्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक खानविलकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. कापडगाव येथे रंगमंचाच्या उभारणीनंतर आता परिसरातील महत्त्वाची गैरसोय दूर करण्यात मोठा वाटा उचलला आहे. कापडगाव येथे माता-पालकांनी हा विषय हाती घेऊन आता रंगमंचाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल शाळेच्या उपशिक्षिका श्यामल नागले यांनी उपस्थित सर्व माता - पालकांचे आभार मानले. या उपक्रमामुळे परिसरात माता-पालक संघाच्या सदस्यांचे आभार मानण्यात आले.(प्रतिनिधी)
माता-पालक श्रमदानातून उभारला गेला रंगमंच
By admin | Published: December 01, 2014 9:42 PM