रत्नागिरी : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ५४व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी रत्नागिरी केंद्रावर घेण्यात आली. स्पर्धेतील संस्थांचा सहभाग चांगला होता. परंतु संस्थांनी चौकटीबाहेर पडून नाविन्याचा शोध घेणे अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया परीक्षक मानसी राणे (अमरावती), विश्वास देशपांडे (पुणे) सुरेश बारसे (अमरावती) यांनी व्यक्त केली. स्पर्धेच्या समारोपानंतर परीक्षकांनी पत्रकारांशी वार्तालाप साधला.स्पर्धेमध्ये संस्थांचा सहभाग वाढत आहे. संस्था, कलाकारांच्या उत्साहाबरोबरच रसिक प्रेक्षकांचाही उत्साह वाखाणण्याजोगा आहे. मुंबई, पुण्यापेक्षा रत्नागिरी शहरात प्रेक्षकांचा प्रतिसाद नक्कीच चांगला असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रावर हाऊसफुल्लचा बोर्ड पाहिल्यावर तर खूपच समाधान वाटले. येथील नाट्य संस्था तसेच नाट्य परिषदेतर्फे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरी केंद्रावर घेण्याची विनंती करणे आवश्यक आहे. जेणेकरून येथील प्रेक्षकांना संस्थांना दर्जेदार नाट्य कलाकृती पाहण्यास मिळेल. बालनाट्य तसेच हिंदी नाट्य स्पर्धादेखील रत्नागिरी केंद्रावर होणे आवश्यक आहे. नाट्य संस्थांनी जुन्या नाट्यसंहिता निवडण्याऐवजी नवी संहिता निवडणे गरजेचे आहे. नुकत्याच झालेल्या स्पर्धेत जुनी व चौकटीतली नाटके सादर करण्यात आली. चौकटीतील नाटके सादर करण्यात आली असली तरी यापुढे याबाहेर जाऊन संस्थांनी नाटक सादर करावे अंतिम फेरीसाठी मागणी करत असतानाच येथील नाट्यगृहातही सुधारणा होणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनानेदेखील त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रकाशयोजना, ध्वनी योजना, तसेच हाताळणी याबाबत त्रुटी आहेत. संगीत नाट्य स्पर्धेपूर्वी तरी या त्रुटींची पूर्तता व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)प्राथमिक फेरीला चांगला प्रतिसाद. चौकटीबाहेर पडून नाविन्याचा शोध घेण्याचा परीक्षकांचा सल्ला. रसिक प्रेक्षकांचा सहभाग वाढत असल्याबद्दल समाधान. बालनाट्य व हिंदी नाट्य स्पर्धा रत्नागिरी केंद्रावर होणे आवश्यक. नाट्यगृहातही सुधारणा होणे गरजेचे.
नाट्यसंस्थांनी चौकटीबाहेर शोध घ्यावा
By admin | Published: November 30, 2014 9:51 PM