चिपळूण : कंपनीच्या मालवाहू ट्रकमध्ये गोवा बनावटीची दारू घेऊन जात असताना हा ट्रक तालुक्यातील असुर्डे परिसरात उलटल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असून, त्याच्याविरोधात सावर्डे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शंभू खिमगिरी (रा. जेरान-राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.
याबाबतची फिर्याद उमेश कांबळे (सावर्डे पोलीस स्थानक) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खिमगिरी हा आपल्या ताब्यातील मालवाहू ट्रकच्या हौद्यात कंपनीच्या मालाचे कॅरिंग रोलरचे २८ बाॅक्स भरून त्यामध्ये विनापरवाना गोवा बनावटीच्या दारूचे बाॅक्स हे कंपनीच्या मालाच्या बॉक्समध्ये लपवून ठेवले होते. कंपनीच्या मालाच्या ४ बाॅक्सचा वापर करून त्याद्वारे तो बेकायदेशीर विदेशी दारू घेऊन गोवा ते गुजरात असा घेऊन जात होता. मुंबई-गोवा महामार्गाने जात असताना तो शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील असुर्डे-बनेवाडी परिसरात आला असता त्याने रस्त्याचे विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने तसेच वाहन बेदरकारपणे चालविल्याने ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटला. या अपघातानंतर ट्रकचालक खिमगिरी याने अपघाताची खबर न देता तो पळून गेला. याप्रकरणी त्याच्यावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकारानंतर ४ लाख किमतीचा ट्रक, ४ लाख ५४ हजार १६८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल प्रदीप गमरे करीत आहेत.