मेहरून नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे ऑनलाईन अध्यापनासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार दि. १४ जूनपासून जिल्ह्यातील शाळांमध्ये ऑनलाईन अध्यापन सुरू झाले आहे. जिल्ह्यातील एकूण १,५३४ गावांपैकी ९७३ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. शासन निर्णयानुसार संबंधित गावातील ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती गावातील शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेऊ शकतात.
गतवर्षीही प्रथम शैक्षणिक सत्र ऑनलाईनच सुरू होते. नोव्हेंबरमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग जानेवारीपासून सुरू करण्यात आले. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पहिली ते बारावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करून सरसकट विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षीप्रमाणे नवीन शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरू झाले, मात्र प्रत्यक्ष अध्यापनाऐवजी ऑनलाईन अध्यापनासाठी परवानगी देण्यात आली आहे. जी गावे कोरोनामुक्त झाली आहेत, त्या गावातील शाळा सुरू करता येऊ शकतात. मात्र त्यासाठी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने एकत्र येऊन निर्णय घेणे गरजेचे आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असली तरी जिल्ह्यातील १,५३४ गावांपैकी ६५ गावे गेल्या महिन्यापर्यंत कोरोना वेशीवरच रोखण्यात यशस्वी झाली होती. सद्यस्थितीत आरोग्य विभाग, प्रशासनातर्फे घेण्यात आलेल्या खबरदारीमुळे जिल्ह्यातील एकूण ९७३ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. गावातून कोरोना हद्दपार झाल्याने गावे व ग्रामस्थ सुरक्षित आहेत. शासकीय नियमावलींचे पालन करून या गावातील शाळा प्रत्यक्ष सुरू होऊ शकतात. ग्रामस्थांनी शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली तर ९७३ कोरोनामुक्त गावातील शाळांमध्ये दीड वर्षानंतर मुलांचा किलबिलाट सुरू होऊ शकतो.
......................
शासन निर्णयानुसार कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करता येऊ शकतात. मात्र त्यासाठी ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीने एकत्रित येत निर्णय घेणे आवश्यक आहे. मात्र शासकीय नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे.
- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी