...तर १५ ऑगस्ट रोजी कुटुंबासह आत्मदहन करणार
- आरोग्यसेवक परीक्षा पास झालेल्या दहा फवारणी कर्मचाऱ्यांचा इशारा
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : राज्य सरकारने २८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेला आरोग्य भरतीचा निकाल तब्बल चार महिन्यांनंतर जाहीर केला आहे. या निकालामध्ये जिल्ह्यातील दहा हंगामी कर्मचारी पास झाले आहेत. मात्र, बीड व इतर ठिकाणाहून हंगामी कर्मचारी असल्याचे बोगस प्रमाणपत्रधारक उमेदवार मोठ्या प्रमाणात आल्यामुळे जिल्ह्यातील एकही उमेदवार अंतिम यादीमध्ये येऊ शकलेला नाही, असा आरोप आराेग्यसेवक परीक्षा पास झालेल्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. याविषयी वेळीच न्याय न मिळाल्यास १५ ऑगस्ट रोजी कुटुंबीयांसमवेत आत्मदहन करणार असल्याचाही इशारा दिला आहे.
बीड जिल्हा हिवताप कार्यालयातून मोठ्या प्रमाणात बोगस प्रमाणपत्र वितरित करण्यात आल्याचा आराेप या कर्मचाऱ्यांनी केला. या बोगस प्रमाणपत्रधारकांमुळे १९९८ पासून हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून काम करीत असलेल्या रत्नागिरीमधील उमेदवारांवर अन्याय होत आहे. अर्धेअधिक आयुष्य शासकीय नोकरी लागेल अशी वाट पाहत बसलेल्या या कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे. शासकीय नोकरी लागण्याचे वयही निघून गेले आहे. त्यामुळे आता जगून तरी काय उपयोग, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांनी विचारला आहे.
शासन जर आमचा विचार करीत नाही, तर कोण करणार? त्यामुळे यापुढे कोणताही मार्ग शिल्लक न राहिल्यामुळे कुटुंबासह आत्मदहनाचा टोकाचा निर्णय या दहा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये इकबाल चौगुले, विजय राऊत, नीलेश गुलेकर, प्रशांत शिंदे, अजित खुणम, मंगेश जाधव, सुरेश दैत, राजेश कनियारीकल, सचिन कदम, प्रसाद पाठोळे या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक व आरोग्य विभागाला दिले आहे.