राजापूर : आपल्या कारभाराचे १०० दिवस पार करणाऱ्या फडणवीस सरकारच्या अपयशाविरुद्ध राज्यभर रास्तारोको करण्याचा निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठ स्तरावरुन घेण्यात आला असताना, त्याबाबत राजापूर तालुका काँग्रेसलाच कोणत्या प्रकारची कल्पना न देण्यात आल्याने, ९ फेब्रुवारीला राजापुरात काँग्रेसचे रास्तारोको ओदोलन होऊच शकले नाही.राज्यातील सत्तांतरानंतर युतीचे सरकार राज्यात सत्तेवर आले. सरकारने कारभाराचे शंभर दिवस ९ फेब्रुवारीला पार केले. मात्र या कालखंडात सरकारने समाधानकारक कामे केली नाहीत व सर्वच आघाड्यांवर ते सपशेल आपटले, अशी जोरदार टीका काँग्रेसकडून करण्यात आली. ९ फेब्रुवारीलाच या सरकारच्या कारभाराविरुद्ध ठिकठिकाणी रास्तारोको करण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरुन पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला होता व त्याबाबतच्या सूचना प्रत्येक जिल्हा व तालुका कार्यकारिणीला देण्याचे ठरले होते. त्यानुसार काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व राजापूरचे सुपुत्र हरीश रोग्ये यांनी राजापुरात पत्रकार परिषद घेऊन फडणवीस सरकारवर तुफान टीका केली होती. मात्र, या काँग्रेस प्रवक्त्यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कदाचित नियोजित आंदोलनाची माहिती न दिल्याने ९ तारखेचे आंदोलन होऊ शकले नाही.याबाबत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र नागरेकर हेच आंदोलनाबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसले. ८ फेब्रुवारीला रात्री त्यांना राजापूर पोलीस ठाण्याकडून आंदोलनाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी असे काही आंदोलन पक्षाने घेतले, त्याची त्यांना पुसटशी देखील कल्पना नव्हती. त्यामुळे तेच आश्चर्यचकीत झाले. वरिष्ठ पातळीवरुन पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कसलीच कल्पना दिली गेली नाही. त्यामुळे ९ तारखेला काँग्रेसचे कुणीही हजर राहिले नव्हते.देशभरामध्ये विविध निवडणुकांत सातत्याने पराभवाचा सामना करणाऱ्या काँग्रेसची अवस्था राजापूर तालुक्यातही फारच सोचनीय झाली आहे. नियोजित आंदोलनाची उशिरा खबर मिळून देखील त्यांनी आंदोलन न छेडणे यावरुन त्या पक्षाची झालेली जोरदार पिछेहाट दिसून आलीच. शिवाय पक्षांतर्गत नाती आलबेल नसल्याचेही पुढे आले आहे. या सर्व परिस्थितीत पक्षाची घसरण होत असल्याचेच पुढे येत आहे. (प्रतिनिधी)
राजापुरात काँग्रेसचे आंदोलन झालेच नाही
By admin | Published: February 09, 2015 11:10 PM