रत्नागिरी : काेराेना संसर्गाची लागण झाली आहे किंवा नाही हे जलद कळण्यासाठी एचआरसीटी चाचणी करण्यात येत आहे. मात्र, ही चाचणी केल्यानंतर त्याबाबतची काेणतीच नाेंद शासकीय यंत्रणेकडे हाेत नसल्याने रुग्ण काेराेनाबाधित रुग्ण आहे की नाही, याची माहिती मिळत नसल्याची बाब समाेर आली आहे. एचआरसीटीमध्ये पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णावर थेट अंत्यसंस्कार केले जात असल्याने, त्याचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण हाेत आहे.
ताप, सर्दी, खाेकला असल्याचे अनेक जण खासगी रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत. तेथे काही काळ उपचार केल्यानंतर डाॅक्टरांना संशय आल्यास त्यांना थेट एचआरसीटी करण्यास सांगितले जाते. एचआरसीटी चाचणीत क्ष-किरणे व संगणकीय प्रणालीचा वापर करून छातीच्या आत असलेल्या विविध अवयवांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या, विविध कोनांतून अनेक प्रतिमा घेतल्या जातात. फुप्फुसाचा किती टक्के भाग संसर्गित झाला आहे, हे चाचणी करून, कोरॅड-स्कोअरद्वारे अचूक कळते. हा स्कोअर एक ते आठ असेल, तर सौम्य आठ ते १५ असेल, तर मध्यम (मॉडरेट) आणि १५ पेक्षा जास्त असेल, तर तीव्र आजार असण्याची शक्यता असते.
एचआरसीटी चाचणीतून काेराेना संसर्गाचे लवकर निदान हाेत असल्याने ही चाचणी उपयुक्त ठरत आहे. मात्र, खासगी लॅबमधून हाेणाऱ्या या चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांची शासन दरबारी काेठेच नाेंद हाेत नसल्याचे निदर्शनास येत आहे. या चाचणीचा अहवाल खासगी डाॅक्टर आणि नातेवाइकांपुरतेच मर्यादीत राहत आहेत. त्यातच त्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचीही नाेंद हाेताना दिसत नाही. काेराेनाचा संसर्ग वाढत असतानाच, अशा प्रकारची चाचणी केल्यानंतर त्याची नाेंद शासन दरबारी हाेणे गरजेचे आहे.
.................................
धाेका वाढण्याची भीती
एचआरसीटी चाचणीत व्यक्तीला काेराेनाची लागण झालेली असल्यास इतरांना संसर्ग हाेण्याचा धाेका अधिक आहे. त्यातच याची काेठेही शासकीय स्तरावर नाेंद हाेत नसल्याने अशा व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर परस्पर अंत्यसंस्कार केले जात आहेत. या अंत्यसंस्काराला जाणाऱ्या व्यक्तींना किंवा रुग्णांच्या आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांना संसर्ग हाेण्याचा धाेका अधिक आहे.