रत्नागिरी : सन २०२१च्या जनगणनेत आदिवासींसाठी स्वतंत्र कॉलम करा, अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आदिवासी समाजाची संस्कृती ही स्वतंत्र असून, कुठल्याही धर्मांशी मिळतीजुळती नाही. आदिवासी समाजाच्या रितीरिवाज, रूढीपरंपरा, जीवनशैली भाषा, पोशाख इत्यादी विशिष्ट प्रकारचे आहेत.
इंग्रजांच्या काळात जनगणनेत प्रपत्रामध्ये ओबॉजीनीज, ॲनामिस्ट ट्रायबल असे म्हणून आदिवासींची ओळख होती. मात्र, स्वतंत्र भारताच्या जनगणनेत आदिवासींचा अस्तित्व दाबले जात असल्याचा आरोप शासनावर करण्यात आला आहे. सन २०२१च्या जनगणनेत आदिवासींचा स्वतंत्र कॉलम करण्यात यावा, अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचा इशारा पावरा यांनी दिला आहे.