लांजा
: तालुक्यात स्वच्छ इंधन, बायोफ्युएल निर्मिती जागतिक जैव इंधन प्रकल्प आदिष्टी ॲग्रो ऑरगॅनिक प्रोड्युसर कंपनी लि. आणि एम. सी. एल., मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच तालुक्यातील प्रभानवल्ली येथे कार्यान्वित होणार आहे.
ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत असलेले प्रदूषणकारी इंधन हद्दपार करण्यासाठी गवत आणि पालापाचोळ्यापासून जैव इंधन तयार करून आपल्या शेतकऱ्यांना रोजगार निर्मिती करण्याचे साधन निर्माण करण्यासाठी जैव इंधन, सेंद्रिय शेती व सेंद्रिय खत निर्माण करणारा हा अभिनव उपक्रम आहे. या तीन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास होणार असल्याची माहिती कंपनीच्या संचालिका अस्मिता गुरव यांनी दिली.
या प्रकल्पामुळे संपूर्ण तालुका इंधनामध्ये स्वयंपूर्ण करण्याचा मानस आहे. वाहतुकीसाठी लागणारे स्वच्छ इंधन, स्वयंपाकासाठी लागणारा स्वच्छ गॅस, औद्योगिक कारखान्यांसाठी लागणारे इंधन अशी आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्राप्त स्वच्छ इंधनाची निर्मिती केली जाणार आहे. या इंधन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल म्हणजे हत्ती गवत प्रत्येक गावातील शेतात निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांसोबत शेती करार केले जाणार आहेत. त्यांचा निर्माण होणारा कच्चा माल हमीभावाने विकत घेतला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जमीन नाही, अशा शेतकऱ्यांसाठी एम. सी. एल.कडे इतर शेतीपूरक उद्योगव्यवसाय उपलब्ध आहेत. त्यासाठी लागणारे आर्थिक सहाय्य कंपनीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती अस्मिता गुरव यांनी दिली.
मीरा क्लिनप्युअल लिमिटेड (एम. सी. एल.) या कंपनीच्या माध्यमातून लांजा तालुक्यात अंदाजे २ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे प्रत्येक शेतकऱ्याला
५ हजार ते १० हजार रुपये कायमस्वरुपी आणि शाश्वत मासिक उत्पन्न मिळवून देण्याचा कंपनीचा मानस आहे.
तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, मजुरांसाठी तसेच सुशिक्षित तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी संघटित होणे गरजेचे आहे, असे आदिष्टी ॲग्रो ऑरगॅनिक प्रोड्युसर कंपनी लि.च्या. संचालिका अस्मिता गुरव यांनी सांगितले.