रत्नागिरी : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून निष्काळजीपणा घडला, त्यामुळे एक जागा गमवावी लागली. मात्र, विधानपरिषदेच्या निवडणुकीत निष्काळजीपणाची पुनरावृत्ती होणार नाही. तसेच राज्यसभा निवडणुकीत गणितं कोणी जुळवली, हे अख्ख्या देशाने पाहिले आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी सर्व जागा जिंकेल, असा विश्वास उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.ते पुढे म्हणाले, राज्यसभेच्या निवडणुकीत कशा पद्धतीने गणितं जुळली होती, यापेक्षा कुणी जुळवली, हे अख्ख्या देशाने बघितले आहे. विधानपरिषदेची निवडणूक दि. २० जूनला होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. आमचे दोन्ही सदस्य विधानपरिषदेत जातील. राज्यसभा निवडणुकीत जो निष्काळजीपणा घडला, त्याची पुनरावृत्ती होणार नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले.धोपेश्वर रिफायनरीबाबत विरोधक आणि समर्थक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. बहुसंख्य ग्रामस्थ रिफायनरी पाहिजे म्हणून सांगणारे आहेत. बेरोजगारीचा प्रश्न पाहता, तेथील जनतेला हा प्रकल्प हवा असेल, तर मुख्यमंत्री या प्रकल्पाचा विचार करतील, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
नीतेश राणेंना टाेलापर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोद्धा दौऱ्यावरून टीका करणाऱ्या भाजप आमदार नीतेश राणे यांनाही उदय सामंत यांनी टाेला हाणला. ज्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली, त्यांची उंची आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा मोठी आहे असे वाटत नाही, असे उदय सामंत म्हणाले. विरोधकांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली म्हणून आदित्य ठाकरे घाबरणार नाहीत, उलट ते दौरा यशस्वी करून परत येतील, असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला.
मंदिर हलणार नाहीरत्नागिरी शहरातील मारुती मंदिर अन्य ठिकाणी हलविण्याची नोटीस रत्नागिरी नगरपरिषदेने बजावली असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, अशा प्रकारची कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही. तसेच मारुतीचे मंदिर हलविण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष सुभाष वैद्य उपस्थित होते.