अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : निसर्गातील बदलाची सर्वप्रथम चाहुल लागते ती पशु-पक्ष्यांना! पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा सर्वांनाच लागलेली असते. त्यामुळे त्याच्या आगमनाचे ठोकताळेदेखील मांडले जातात. पाऊस येण्याचे संकेत काही वनस्पती आणि पक्षीदेखील देतात.
चातक (जाकोबीन कुकू)
पावसाच्या आधी नवरंग (इंडियन पिट्टा), तिबोटी खंड्या (ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर), चातक (जाकोबीन कुकू) आणि पावशा (कॉमन हॉक कुकू) हे पक्षी कोकणात दिसू लागले की, पाऊस जवळ आल्याचे मानले जाते, अशी माहिती रत्नागिरीतील पक्षीमित्र प्रसाद गोखले यांनी दिली.पावशा (कॉमन हॉक कुकू)
पावसाळ्याच्या आधी एक ते दीड महिना नवरंग हा पक्षी दिसू लागतो. हा पक्षी कोकणात सर्वत्र दिसतो. गतवर्षी हाच पक्षी १५ एप्रिलनंतर दिसू लागला होता. मात्र, यावर्षी हा पक्षी २६ मेच्या दरम्याने दिसू लागला होता. नवरंगाच्या विणीचा काळ मे ते आॅगस्ट हा असतो. गवत, झाडांचे मूळ, काड्या यापासून बनविलेल्या घरट्यात पक्ष्याची मादी चार ते सहा अंडी देते.
तिबोटी खंड्या (ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर)तिबोटी खंड्या हादेखील पावसाच्या आगमनाची चाहुल देणारा पक्षी आहे. श्रीलंकेपासून भारतात सर्वच ठिकाणी हा पक्षी आढळतो. पाणथळीच्या जागेजवळ हा जास्त प्रमाणात दिसतो. मातीमध्ये बिळ तयार करून हा पक्षी राहतो.
नवरंग (इंडियन पिट्टा)
गतवर्षी २८ एप्रिलला दिसलेला पक्षी यावर्षी ७ मे रोजी दिसला होता. पावसाशी आपले घट्ट नाते सांगणारा पक्षी म्हणजे चातक पक्षी. हा पक्षीदेखील पाणथळीच्या जागी आढळतो. पावसाच्या एका थेंबावर आयुष्य काढणारा पक्षी अशीही त्याची ओळख आहे.
पावसाळ्याच्या काळात तो भारतात स्थलांतर करतो. पावसाशी आपले नाते सांगणारा दुसरा पक्षी म्हणजे पावशा. हा पक्षी ओरडताना पेरते व्हा पेरते व्हा असा आवाज येतो. त्यामुळे पाऊस जवळ आल्याचे जणू तो संकेतच देत असतो. त्याच्या आवाजाने सारेच पावसाकडे डोळे लावून बसतात.
साधारणत: मे ते ऑगस्ट महिन्याचा कालावधी हा पक्ष्यांचा विणीचा कालावधी असतो. त्यासाठी हे पक्षी कोकणात दाखल होत असतात. एकमेकांना आकृष्ट करण्यासाठी हे पक्षी ओरडत असतात. त्यातूनच ते पावसाचे संकेत देतात. निसर्गाची नाते जोडलेल्या या पक्ष्यांचे अस्तित्व माणसांमुळे आता धोक्यात आल्याची खंत आहे.- प्रसाद गोखलेपक्षीमित्र, रत्नागिरी.