मेहरून नाकाडे।रत्नागिरी : राज्यसंरक्षित स्मारक घोषित म्हणून घोषित झालेला येथील थिबा राजवाड्याच्या देखभाल-दुरूस्तीचे काम गेली चार वर्षे संथगतीने सुरू असून अजून या कामाला एक वर्ष लागणार आहे. ही कामे जलदगतीने करुन पर्यटकांसाठी राजवाडा खुला करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
थिबा राजवाडा राज्यसंरक्षित स्मारक घोषित केल्यानंतर दुरूस्तीसाठी मार्च २०११ मध्ये निधी मंजूर झाला. राजवाड्याच्या दुरूस्तीसाठी मार्च २०११ मध्ये निधी आला मात्र मुदतीपूर्व खर्च न पडल्याने निधी पुन्हा शासन दरबारी जमा झाला होता. त्यामुळे जानेवारी २०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाकडे दोन कोटीचा प्रस्ताव पुरातत्व विभागाकडून पाठविण्यात आला. त्याला तीन वर्षानंतर (२०१४-१५) मान्यता मिळाली. दुरूस्तीसाठी २ कोटी १७ लाख १२ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला व टप्याटप्याने दुरूस्तीचे काम करण्याचे नियोजन करण्यात आले. सध्यादोन टप्यातील दुरूस्ती पूर्ण झाली असून परिसर विकासाची कामे सुरू आहेत.
दोन्ही टप्प्यात छप्पर दुरूस्ती, कौले बदलणे, गच्ची, सज्जे, खिडक्या, जिने व पानपट्टी, पन्हाळची कामे करण्यात आली. पुरातत्व विभागाच्या सुचनांनुसार संपूर्ण लाकडी काम सागवानी लाकडामध्ये करण्यात आले आहे.कामे सुरू असल्याने राजवाड्याचा मुख्य प्रसाद मात्र पाहता येत नाही. राजवाड्याच्या मागील बाजुला असणारे संग्रहालय पाहून पर्यटकांना परतावे लागते.
परिसर विकासाची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. दालनाच्या सुशोभिकरणासाठी ९० लाखाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. निधी मिळाल्यानंतर प्रत्येक दालन सुशोभित करून संग्रहालय मांडले जाणार आहे. त्यानंतरच राजवाडा पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे. यासाठी अजून वर्षभराचा तरी कालावधी लागेल.- ऋत्विज आपटे, जतन सहाय्यक, पुरातत्व विभाग.