प्रकाश वराडकर -- रत्नागिरी नगरपरिषदेच्या एकूणच कामकाजावर, कारभारावर नजर राहावी व कारभारात सुधारणा करता यावी, यासाठी वर्षभरापूर्वी नगरपालिका कार्यालयात २४ सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसवण्यात आले. मात्र, हा उद्देश किती सफल झाला, हा संशोधनाचा विषय आहे. परंतु या यंत्रणेचा राजकीय लाभासाठी वापर होत असल्याने ही यंत्रणाच पालिकेतून हटविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ज्या यंत्रणेमुळे पालिकेच्या कामकाजात फरक नाही, कारभार पूर्वीप्रमाणे संथ गतीनेच चालतो व राजकीय कुरघोडीसाठीच केवळ या सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यांचा वापर होत असेल तर त्यावर दर महिना खर्च करण्याची गरजच काय, असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. रत्नागिरी पालिका कार्यालयात वर्षभरापूर्वी चार लाखांपेक्षा अधिक खर्च करून विविध विभागात सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्यात आले. त्यावेळी या यंत्रणेबाबत मोठे आशादायक चित्र रंगविण्यात आले होते. यामुळे कार्यालयीन कामकाज सुधारणार असून, कामचुकारपणा करणाऱ्यांना आळा बसणार असल्याचेही त्यावेळी सांगण्यात आले होते. खरेतर नगरपरिषदेवर सेना-भाजप युतीची सत्ता आल्यानंतर कार्यालयात सर्वच विभागात सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव नगरसेवक राहुल पंडित यांनी मांडला होता. त्यानंतर या विषयावरून काही दिवस चर्चा सुरू होती. मात्र, त्यानंतर हा विषय मागे पडला होता. परंतु नगराध्यक्षपदी महेंद्र मयेकर आल्यानंतर या विषयाला चालना मिळाली. सी. सी. यंत्रणा बसविण्यात आली. त्याचा वर्षभरातील आढावा घेतल्यास त्यातून काहीही निष्पन्न झाल्याचे चित्र दिसून येत नाही. पालिकेतील काही राजकीय पदाधिकाऱ्यांचाही हाच आरोप आहे. त्यामुळे ज्या यंत्रणेचा उपयोग नाही ती हवीच कशाला, असा सवाल केला जात आहे. कर्मचाऱ्यांना कोणी भेटावयास गेले वा कर्मचारी कोणा पदाधिकाऱ्यास भेटण्यास गेले तर त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना बोलावून राजकीय कुरघोड्या केल्या जात आहेत, असा पदाधिकाऱ्यांचाही आरोप आहे.कर्मचारी या सर्व प्रकारात काम करताना दडपणाखाली असतात. त्यामुळे ज्या ठिकाणी संभाव्य लाभाची टेबल्स आहेत, त्याठिकाणी हे सी. सी. टी. व्ही. लावण्याची गरज असताना ते दुसऱ्याच ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वार व जेथे जनतेशी थेट संबंध असणारे कर्मचारी काम करतात, त्याठिकाणीच हे सी. सी. कॅमेरे ठेवण्यात यावेत. अन्यथा ही यंत्रणाच पालिकेतून हद्दपार करावी, अशी मागणी पालिका वर्तुळातून होत आहे. सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्याचा हा विषय येत्या काही दिवसात गाजण्याची चिन्हे आहेत. कुरघोड्या नकोच : दुसऱ्या मजल्यावरून नियंत्रण की दडपण?रत्नागिरी नगरपरिषद कार्यालयात याआधी ‘लेट कमर्स’ची समस्या होती. त्यामुळे हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्यात आली. तरीही कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे अधिकाऱ्यांना काहीसे कठीण जात होते. या पार्श्वभूमीवर कार्यालयात सी. सी. टी. व्ही. यंत्रणा तळमजल्यापासून तिसऱ्या मजल्यापर्यंत बसविण्यात आली. या यंत्रणेमुळे तरी कारभारात सुधारणा होईल, असे वाटत असतानाच दुसऱ्या मजल्यावरून या यंत्रणेद्वारे पालिका कार्यालयात कोण येतंय, कोण जातंय, अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये कोण येतंय, अन्य पदाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये कोण येतंय याच्यावर लक्ष ठेवून राजकीय कुरघोडीसाठीच ही यंत्रणा वापरली जात असल्याची चर्चा आहे.$$्निरत्नागिरी पालिकेतील सी. सी. कॅमेऱ्यांद्वारे केलेले चित्रण रोजच्या रोज पाहिले जाते काय? तसे असेल तर किती कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामचुकारपणाबाबत, आपल्या टेबलजवळ नसल्याबाबत पालिकेतून नोटीस देण्यात आल्या, याबाबत संशयाचे धुके निर्माण झाले आहे.
राजकीय लाभासाठीच ‘तिसरा डोळा’?
By admin | Published: May 17, 2016 9:58 PM