रत्नागिरी : कोरोनाच्या काळात झाकोळलेल्या पर्यटन क्षेत्राला कोरोनाचे निर्बंध काही अंशी शिथिल होताच पुन्हा सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. कोरोनाविषयक सर्व त्या नियमांचे पालन करून ‘थर्टी फर्स्ट’ आणि नव्या वर्षाभिनंदनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सज्ज झाले आहे. दि. २ जानेवारीपर्यंत महामंडळाची कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील निवासस्थाने आरक्षित झाली आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची रायगड जिल्ह्यात हरिहरेश्वर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली आणि कुणकेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यात गणपतीपुळे आणि गुहागर तालुक्यात वेळणेश्वर येथे निवासव्यवस्था आहेत. ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप आणि १ जानेवारी २०२२ रोजी नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक उत्सुक झाले आहेत. त्याचबरोबर आता नाताळच्या सुटीतही कोकणात पर्यटन करण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे.
यंदाही थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाभिनंदनासाठी पर्यटकांकडून पर्यटन महामंडळाच्या तीनही जिल्ह्यांमधील निवासस्थानांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. यंदा २० ते २४ डिसेंबर या कालावधीत ७५ टक्के आरक्षण झाले असून, दि. २५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीसाठी ९५ टक्के आरक्षण झाले आहे. हे आरक्षण १०० टक्के होण्याचा विश्वास महामंडळाकडून व्यक्त होत आहे.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने विविध उपक्रम सुरू केले आहेत. पर्यटकांसाठी गणपतीपुळे येथे बोट क्लब सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना बोटिंगचा आनंद घेता येणार आहे. तसेच गणपतीपुळे दर्शन सहल हा नवा उपक्रम सुरू केला असून, त्यासाठी बॅटरी ऑपरेटेड कार उपलब्ध करून दिली आहे. काही दिवसांपूर्वी गणपतीपुळे येथे ‘योगा बाय द बीच’ या उपक्रमाची सुरुवात केली आहे. त्यामुळे आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीनही जिल्ह्यांतील महामंडळाच्या रिसाेर्टमध्ये वास्तव्य करणाऱ्या पर्यटकांना याचा लाभ घेता येणार आहे.
- कोरोनाकाळात लाॅकडाऊन झाल्याने या काळात पर्यटन महामंडळाची निवासस्थाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे महामंडळाचे अतोनात नुकसान झाले. मात्र, निर्बंध उठताच महामंडळाने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती कोरोनाविषयक खबरदारी घेत पुन्हा सज्जता ठेवली आहे. सर्व खोल्या सातत्याने निर्जंतूक करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मास्कचा वापर सक्तीचा केला असून, फिजिकल डिस्टन्सिंगच्या दृष्टीनेही काळजी घेतली जात आहे.
- कोरोनाकाळात कर्मचाऱ्यांमध्ये विविध प्रकाराचे काैशल्य निर्माण होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. हा उपक्रम दर सहा महिन्यांनी राबविला जात आहे. पुण्यातील शासकीय कॅटरिंग काॅलेजच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने हे प्रशिक्षण दिले जाते. सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
२५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत विविध सांस्कृतिक, करमणुकीचे कार्यक्रम, खेळ, स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. कृषी पर्यटनावरही अधिक भर दिला जाणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत पर्यटकांना विविध सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. - दीपक माने, प्रादेशिक अधिकारी (कोकण विभाग), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ