रत्नागिरी : शासन आपल्या दारी या उपक्रमातून युती सरकारने असंख्य लोकांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचवला आहे. हे स्वत:च्या घरात बसून राहणारे सरकार नाही, तर हे योजना घेऊन लोकांच्या दारात जाणारे सरकार आहे, असा शालजोडीतला टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.रत्नागिरीतील कार्यक्रमात शिंदे यांनी अनेकदा उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोलेबाजी केली. आपण सामान्य लोकांचे सामान्य मुख्यमंत्री आहोत आणि हे सामान्य लोकांच्या मनातील सरकार आहे, असे ते म्हणाले. आपल्या दीड वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकालात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १६० कोटी रुपयांची मदत केली आहे. याआधीच्या मुख्यमंत्र्यांच्या अडीच वर्षाच्या काळात फक्त अडीच कोटीच रक्कम लोकांना दिली गेली, असे त्यांनी सांगितले.सध्याचे सरकार गतिमान असल्याने अनेकांना पोटदुखी सुरू झाली आहे. काहींच्या गळ्यातील पट्टाही निघाला आहे. अजूनही काहीजणांना जालीम औषध देण्याची गरज आहे, असेही शिंदे यांनी मिश्किलपणे सांगितले. आपण कोकणी लोकांचा वापर करुन घेणार नाही. ज्यांनी शिवसेनेवर प्रेम केले आहे, त्यांची फसगत न करता, त्यांचा विश्वासघात न करता त्यांच्या हाताला काम देऊ, असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला.
घरात न बसता लोकांच्या दारात जाणारे हे सरकार, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
By मनोज मुळ्ये | Published: November 30, 2023 7:00 PM