रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षाकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, असे मत खासदार नारायण राणे यांनी निवडून आल्या आल्या मांडले होते. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात न मिळालेली आघाडी हाच त्यांचा सूर असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात असताना बुधवारी सायंकाळी माजी खासदार निलेश राणे यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरही दावा करणारे नवे विधान केले आहे. ज्यामुळे नवा राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीची ताकद मोठी असतानाही महाविकास आघाडीला १० हजाराचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे महायुतीमध्ये नांदा सौख्य भरे या संदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचे मत नारायण राणे यांनी मांडले होते. बुधवारी सकाळी आमदार नितेश राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सर्वच घटक पक्षांनी चांगले काम केले असल्याचे सांगितले. मात्र बुधवारी सायंकाळी निलेश राणे यांनी एक्स (ट्वीटर)वर एक पोस्ट केली आहे.
‘‘नितेशने फक्त राजापूर मतदारसंघावर भाजपचा दावा सांगितला... माझं म्हणणं आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ पण पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा आहे. तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणारच...’’ असे विधान त्यांनी यातून केले आहे. एकीकडे रत्नागिरीत शिंदेसेनेचे आमदार उदय सामंत आहेत आणि दुसरीकडे राजापूरच्या जागेवर किरण सामंत यांनी शिंदेसेनेचा दावा याआधीच केला आहे. आता या दोन मतदारसंघावर दावा करण्यासाठी भाजप पुढे आल्यास त्यातून नवा संघर्ष होण्याची शक्यता आहे.