खेड : गेली पंधरा वर्षे निळवणे गावातील शेतकरी कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत़ त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ त्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याशी चर्चा केली असून, त्यांना नक्की न्याय मिळेल, असा विश्वास आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला.
जुलै २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये निळवणे चिंचवाडीतील ३० घरांचे पुनर्वसन करण्यात आले होते. या सर्व बाधित घरांच्या पुनर्वसनासाठी शासनाने एक लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. यापैकी १८ घरांना हा निधी पूर्ण मिळाला मात्र शिवाजीनगर येथील उर्वरित १२ घरांना केवळ चाळीस हजार रुपये मिळाले आहेत. या निधीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही या बाधित घरांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक उर्वरित ६० हजार रुपयांचा निधी मिळाला नाही. या १२ कुटुंबीयांवर शासनाकडून अन्याय झाला आहे. या १२ अन्यायग्रस्त कुटुंबाना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार कदम यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली़ यावेळी सविस्तर वृतांत लेखी स्वरुपात दिला आहे. या प्रकरणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडून अहवाल मागवून घेण्याचे आदेश दिले आहेत.