रत्नागिरी : शिवाजी पार्कवर बैठका घेणाऱ्यांना आता खळ्यात येऊन बैठका घ्याव्या लागतात. याच्यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते असेल. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमच्यावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे स्वतःच्या तोंडाला डांबर फासून घेतील त्याची व्यवस्था मी केली आहे, असे खडेबोल राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विराेधकांना सुनावले.रत्नागिरी तालुक्यातील खालगाव येथे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) महिला व बाल सशक्तीकरण योजना ३ टक्के राखीव निधीअंतर्गत महिला बचत गट विक्री केंद्र तथा महिला बचत गट भवनाचे भूमिपूजन साेमवारी (२७ नाेव्हेंबर) मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विराेधकांवर सडकून टीका केली.ते म्हणाले की, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमच्यावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे स्वतःच्या तोंडाला डांबर फासून घेतील त्याची व्यवस्था मी केली असल्याचे मंत्री सामंत म्हणाले. माझ्या मतदारसंघात येऊन २०० लोकांमध्ये सभा घेऊन माझ्यावर टीका करता याचे उत्तर येत्या आठ दिवसात वरळी येथे येऊन सभा घेऊन ५००० लोकांच्या उपस्थितीत देणार असल्याचे जाहीर केले.
खालगाव येथे उभारण्यात येणाऱ्या विक्री केंद्राच्या माध्यमातून आपल्या बचत गटाची विविध उत्पादने या विक्री केंद्रामधून रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना विक्री केली जातील, याचा मला विश्वास आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध उत्पादने बनवली जातात. मात्र, त्याचे पॅकिंग हे दर्जेदार आणि देखणे असले पाहिजे. यासाठी उपाययोजना करण्याचीही सूचना त्यांनी केली. भविष्यात हे विक्री केंद्र करबुडे जिल्हा परिषद गटातील महिलांच्या रोजगाराला उभारी देणारे विक्री केंद्र असणार आहे, असे ते म्हणाले.या कार्यक्रमाला प्रांताधिकारी जीवन देसाई, प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, जिल्हा परिषदेचे बांधकाम उपअभियंता सोलगावकर, तालुकाप्रमुख महेश म्हाप, महिला तालुकाप्रमुख कांचन नागवेकर, सरपंच प्रकाश खोले, विभागप्रमुख प्रवीण पांचाळ, मिलिंद खानविलकर, हरिश्चंद्र बंडबे, करबुडेच्या सरपंच संस्कृती पाचकुडे, करबुडे जिल्हा परिषद गटातील बचत गटातील पदाधिकारी, महिला उपस्थित होत्या.