रत्नागिरी : कोरोनाच्या प्रादुर्भावात अनेक जण ११२ दिवस पूर्ण झाल्यानंतरही लसीकरणाच्या डोसपासून अनेक वंचित आहेत. दुसरा डोस घेणाऱ्या लोकांना प्राधान्य द्यावे. नियोजनाप्रमाणे होणाऱ्या एकूण लसीकरणापैकी ५ टक्के डोस पंचायत समिती सदस्यांना तर १० टक्के डोस जिल्हा परिषद सदस्यांना द्यावेत, अशी मागणी गुरुवारी झालेल्या रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत सदस्यांनी केली.
सभापती संजना माने यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. या सभेत शिक्षण, आरोग्य या विषयांवर जोरदार चर्चा झाली. या सभेत लसीकरणाचा मुद्दा सदस्य गजानन पाटील यांनी उपस्थित केला. रत्नागिरी तालुक्यात लसीकरणाबाबत योग्य नियोजनाची गरज असून, सकाळी ६ वाजल्यापासून रांगेत उभे राहूनही लोकांना लस मिळत नाही. मात्र, गावातील स्थानिक माणसाला कोणाच्या तरी सांगण्यावरून टोकन दिली जातात. संबंधित व्यक्तीकडून स्वत:च्या मर्जीतील लोकांना टोकन दिल्यानंतर लस दिली जाते. त्यामुळे रांगेत उभे राहूनही लोकांना घरी परतावे लागत असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर पहिला डोस घेऊनही ११२ दिवस उलटूनही दुसरा डोस मिळालेला नाही. अशा लोकांना प्राधान्याने लस देण्याची आवश्यकता आहे, असेही पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी दुसरा डोस न मिळाल्यांची यादी तयार करून जास्त दिवस झाले असतील, अशा लोकांना प्राधान्य द्यावे लागेल. त्यासाठी योग्य नियोजन करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
शालेय पोषण आहाराचे धान्य सभापती तसेच नियुक्त केलेल्या ५ सदस्यीय समितीला कोणतीही सूचना न देता वाटप करण्यात आले. त्यामुळे हा लोकप्रतिनिधींचा अपमान आहे. त्यासाठी शालेय पोषण आहाराच्या ठेकेदाराला त्याचे बिल अदा करण्यात येऊ नये, असा ठराव मंजूर करण्यात आला. २१ जुलैपासून १० ते ३ वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सन २०२०-२१ ची पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी तालुक्यातून पाचवीचे १,२५४ तर इयत्ता आठवीचे ६६ विद्यार्थी बसणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांची दररोज चाचणी घेण्यात येते, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी सशाली मोहिते यांनी दिली.
यावेळी उपसभापती उत्तम सावंत, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, सदस्या प्राजक्ता पाटील, निधी भातडे, स्नेहा चव्हाण, साक्षी रावणंग, मेघना पाष्टे, सदस्य उत्तम मोरे, शंकर सोनवडकर, सुनील नावळे व अन्य उपस्थित होते.