गणपतीपुळे : गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात सोमवार, दिनांक १६ रोजी येथील स्थानिक ग्रामस्थांसह हजारो पर्यटकांनी श्री दर्शनाची पर्वणी साधत मनोभावे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन यांनी विशेष काळजी घेतली होती.पहाटे ४ वाजता स्वयंभू श्री गजाननाची शोडशोपचारे पुजा करण्यात आली. त्यानंतर ५ वाजता महाआरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. प्रथम ५.३० ते ७.३० या वेळेत स्थानिक ग्रामस्थांना दर्शनासाठी राखीव ठेवण्यात आला होता. यावेळी मालगुंड, नेवरे, भगवतीनगर, निवेंडी, वरवडे, धामणसे, जाकादेवी, रत्नागिरी आदी ठिकाणाहून स्थानिक ग्रामस्थांनी श्री दर्शन घेतले.
प्रथमत: कोरोनाची लाट आली त्या पाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानानंतर कोरोनामधून सावरतानाच अर्थकारण सर्वच ठिकाणातून कोलमडण्याचे मोठे संकट होते. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मंदिरे पुन्हा एकदा चालू करण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा येथील लॉज व्यावसायिक, हॉटेल्स व्यावसायिक, समुद्रावरील छोटे मोठे व्यावसायिक यांना होईल, यात शंकाच नाही. येत्या काही दिवसांतच गणपतीपुळे परिसरात समाधानकारक गर्दी होईल.सहा फुटाचे अंतरमंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे ६ फुटांचे चौकोन आखण्यात आले असून, हे चौकोन सुमारे २०० इतके आहेत. तसेच मंदिरात प्रवेश करताना मास्क बंधनकारक असून, यावेळी प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायझर मारताना दिसत होते.भाद्रपदी गणेश उत्सवातही गणपतीपुळे येथील व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांची कोरोना महामारीमुळे श्रींचे दर्शन घेतले नव्हते. मंदिर सुरु झाल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनीही मोठी गर्दी केली होती. केवळ जिल्ह्यातीलच नाही तर मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील असंख्य भाविक गणपतीपुळेत दाखल झाले आहेत.
मंदिर प्रशासन व मुख्य पुजारी यांच्या समन्वयामुळे आज दिवसभर कोणतीही अडचणी आली नाही. पहाटे ४ वाजता श्रींची विधीवत शोडशोपचारे पुजा तसेच ५ वाजता श्रींची आरती व ५.३० वाजता मंदिर दर्शनासाठी खुले झाले. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे.- अमित घनवटकरमुख्य पुजारी
कोरोनाच्या महामारीमुळे गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात येण्याचा योग येत नव्हता. मात्र, गणपतीपुळे तीर्थक्षेत्रातील स्वयंभू श्री गजाननाचे श्याम म्हणजे आराध्य दैवत काल रात्री आम्ही मुंबईहून निघालो व आज सकाळी पोहोचलो. सकाळी ८ ते १२ या वेळेत आमचे चांगले दर्शन झाले. संस्थान गणपतीपुळे यांनी चांगली व्यवस्था कोरोनाच्या महामारीत ठेवली. स्वयंभू श्री गजाननाचे दर्शन झाल्यामुळे मी खूश आहे.- रंजना राजेशिर्के,चारकोप, बोरिवली.