रत्नागिरी : गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे काही तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसाचा जोर सध्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात एकूण ९४२.९० मिलीमीटर (सरासरी १०४.७७ मिलीमीटर) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे. सर्वाधिक १५८ मिलीमीटर पाऊस संगमेश्वर आणि त्याखालोखाल रत्नागिरी तालुक्यात १५२.५० मिलीमीटर झाला आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यात उन्हवरे येथील खाडीचे पाणी आत शिरल्याने अंदाजे १३ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. कुमवे येथील रावजी धनकुळवे यांच्या घराचे अंशत: १ हजार ४०० रुपयांचे, सतीश काष्टे यांच्या घराचे १ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. फरारे येथील फरीदा खाते, महमद नाईक, सुलेमान अ. लतिफ खाते, नासीर हसन पेसकर, आसिफ खाते , इब्राहिम अ. काझी खाते यांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरले. फरारे येथे आयुक अब्बास खाते यांच्या घराचा बांध पावसामुळे कोसळला. करजे येथील प्रकाश टेमकर यांच्या घरावरील छताचे अंशत: ४ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. पाजपांजरी येथील हिराबाई पावसे यांच्या घराच्या बाजूची भिंत पावसामुळे पडली असून इतर भितींना तडा गेल्याने २ लाख २ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. भोजन चाईलनगर येथील इब्राहिम अंतुले यांच्या घराची भिंत कोसळून अंशत: नुकसान झाले आहे.
खेड तालुक्यात होडखाड येथे राकेश तांबे यांची २ जनावरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली असून अंशत:
१५ हजार रुपयाचे नुकसान झाले. सवणस येथील सुप्रिया अ. हमिद यांच्या घराचे पावसामुळे अंशत: ७४
हजार ८०० रुपयाचे नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यात वाघिवरे येथे विकास खडपेकर यांचा पऱ्याच्या पाण्यात पडून मृत्यू झाला. आगवे येथील विलास जाधव यांच्या घराचे अंशत: ५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
संगमेश्वर तालुक्यात नावडी येथील जनता स्टोअर्स मेडिकलमध्ये पाणी जाऊन औषधांचे अंदाजे २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.