आॅनलाईन लोकमतरत्नागिरी : जिल्ह्यातील ३१ नळपाणी पुरवठा योजना नादुरुस्त झाल्याने ग्रामीण भागातील हजारो लोकांना त्याची झळ पोहोचत आहे. त्यामुळे या योजनांची लवकरच दुरुस्ती करण्यात येणार असून, त्यासाठी १ कोटी ६० लाख रुपये प्रशासनाकडून खर्च करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी उपाययोजना म्हणून नळ पाणी पुरवठा योजना, विंधन विहीरी, विहीरी आदिंवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे आजही ग्रामीण भागामध्ये नळपाणी पुरवठा योजनांचे जाळे विस्तारलेले आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेच्या पाण्याची सोय झाली आहे.
जिल्ह्यात जीवन प्राधिकरण आणि जलस्वराज प्रकल्प या अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या होत्या. जीवन प्राधिकरणाच्या काही योजना वादग्रस्त ठरल्या होत्या. त्याचबरोबर जलस्वराज प्रकल्पामध्ये राबविण्यात आलेल्या जिल्ह्यात दोन-तीन योजनामध्ये निकृष्ठ दर्जाचे काम करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. मात्र, लोकांना पुरेसा पाणी पुरवठा होत असतानाच जिल्ह्यातील काही योजना नादुुरुस्त झाल्या होत्या. त्यापैकी ३१ नळ पाणी योजना उन्हाळ्यामध्ये दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनांची तालुकानिहाय संख्या खालीलप्रमाणे आहे. तालुका नादुरुस्त योजनामंडणगड१०दापोली०५खेड०५गुहागर०२रत्नागिरी०१लांजा०५राजापूर०३एकूण------ ३१
या योजना नादुरुस्त झाल्याने त्याचा परिणाम ग्रामीण भागातील जनतेला करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यावर होतो. त्यामुळे पाण्यासाठी विहीरी, विंधन विहीरींचा आधार घ्यावा लागतो. या योजना दुरुस्त करण्याचा निर्णय जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. या योजनांच्या दुरुस्तीला जिल्हा प्रशासनाने मंजूरीही दिली आहे. (शहर वार्ताहर)
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हजारो ग्रामस्थांना उन्हाळ्यापूर्वीच पाण्यासाठी भटकंती करावी लागते. कारण ३१ नळ पाणी पुरवठा योजना नादुरुस्त झाल्याने २६ गावातील ५० वाड्यांमधील हजारो लोकांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे. या योजनांची दुरुस्ती झाल्यास हजारो लोकांच्या पाण्याची समस्या सुटणार आहे.