गुहागर : शासनाचे आदेश असतानाही तुम्ही नियमांविरुद्ध दुकान उघडे का ठेवले, असे धमकावून दुकानदाराकडून पाच हजार रुपये लुटणाऱ्या ताेतया अँटी करप्शन विभागाच्या जिल्हाध्यक्षांसह तिघांना गुहागर पाेलिसांनी अटक केली आहे. हे तिघेही चिपळूण तालुक्यातील रहिवासी आहेत़
गुहागर तालुक्यातील खाडीपट्टी भागातील वेळणेश्वर, अडूर, बोऱ्या भागात गेल्या दोन दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. तुमचं दुकान अनधिकृतपणे सुरू आहे. तुमच्या दुकानात दारू विकली जाते, शासनाचे आदेश असतानाही तुम्ही नियमांविरुद्ध दुकान उघडे का ठेवले? आम्ही अँटी करप्शन ऑफिसकडून आलो आहोत. तुमच्याबाबत काही तक्रारी आल्या आहेत. त्या जर मिटवायच्या असतील तर आम्हाला पैसे द्या, असे सांगत पाच ते दहा हजार रुपये घेत या टोळक्याने अनेकांना गंडविले होते.
पिंपर येथील शेखर दत्तात्रय वळंजू यांचे किरणा मालाचे दुकान आहे. दारू पिण्याचा परवाना असून, दुकानात बीअर बाटल्या ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता ईनोवा गाडी (एमएच ०२, सीबी ४२८२) घेऊन तिघेजण आले़ त्यांनी बीअर बाटली मागितली. वळंजू यांनी बाटली देताच आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून कारवाई करणार असल्याचे सांगितले़ उद्या कोर्टात यावे लागेल, असे सांगितले़ या प्रकाराने घाबरून माझ्यावर केस करू नका, असे सांगितल्यावर १० हजार रुपयांची मागणी केली़ तडजोडीनंतर त्यांनी पाच हजार रुपये दिले़
या सर्व प्रकारानंतर वळंजू यांना संशय आल्याने त्यांनी गुहागर पोलीस ठाण्यात माहिती दिली़ त्यांनी पाेलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुहागर पाेलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे़ त्यांच्यावर खंडणी मागणे व खोटे अधिकारी असल्याची बतावणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोलीस निरीक्षक दीपक कदम करीत आहेत.