रत्नागिरी : खवल्या मांजराची तस्करी होत असल्याच्या मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचत वन विभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तीन आरोपींना गुरूवारी रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जिवंत खवले मांजर तसेच वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार, सापळा रचून वन विभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्तरित्या कारवाई करून गुरूवारी रात्री ८.३० वाजता धोपावे (ता. गुहागर) येथे आरोपींना ताब्यात घेतले. महेश महिपत पवार (४३, रा. आगरवायंगणी, ता. दापोली), संदेश शशिकांत पवार (३६, रा. आगरवायंगणी, ता. दापोली) आणि मिलिंद जाधव (४२, रा. धोपावे, ता. गुहागर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून जिवंत खवले मांजर हस्तगत करण्यात आले आहे. सलग दुसऱ्या दिवशी वन्य प्राण्यांच्या तस्करीप्रकरणी या दोन्ही विभागांनी संयुक्त कारवाई केली आहे. बुधवारी उद मांजराच्या तस्करीप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले होते. गुरूवारी रात्री खवले मांजर तस्करीप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
वन्यप्राणी तस्करीचे प्रकार वाढू लागल्याने वन विभागाने या गुन्ह्यांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. गुरूवारी रात्री तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जिवंत खवले मांजर तसेच महिंद्रा कंपनीचे लोगन हे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. या सर्व आरोपींविरूद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कार्यवाही मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूरचे डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख व पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, वनरक्षक सागर गोसावी, वनरक्षक संजय रणधीर, वनरक्षक राहुल गुंठे तसेच पोलीस हवालदार प्रशांत बोरकर, शांताराम झोरे, बाळू पालकर, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोचे विजय नांदेकर यांनी ही कारवाई केली. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी, चिपळूण करत आहेत.