राजापूर : बेकायदा जनावरांची वाहतूक करणाऱ्या टोळक्यांवर राजापूर पोलिसांनी अनेकदा कारवाई करूनही तालुक्यातून स्थानिकांच्या मदतीने बेकायदा जनावरांची वाहतूक राजरोसपणे सुरूच असल्याचे पुढे आले आहे. अशाचप्रकारे बेकायदा जनावरांची वाहतूक करण्याचा प्रयत्न गुरुवारी (८ जुलै) सकाळी ६.३० वाजता केळवली कॅन्टिन येथे उघडकीस आला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. परटवली येथील दिनेश अनंत पावसकर व महंमदअली दाऊद काझी या नागरिकांनी हा प्रकार हाणून पाडला.
याप्रकरणी दिनेश अनंत पावसकर (रा. परटवली) यांनी राजापूर पोलीस स्थानकात माहिती दिली. जनावरांच्या वाहतुकीप्रकरणी टेम्पोचालक रोहित कल्लापा नाईक (वय २४, रा. कागवलाड, ता. उगार, जि. बेळगाव) व सरफराज चांदमिया ठाकूर व हाफिज चांदमिया ठाकूर व चांदमिया अब्बास ठाकूर (सर्व रा. परटवली, राजापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील आठ गाईंची पोलिसांनी सुटका केली आहे. परटवली येथील दिनेश पावसकर हे महंमदअली दाऊद काझी यांच्यासमवेत दुचाकीवरून खारेपाटणकडे जात हाेते. त्यांना केळवली कॅन्टिन येथे अवैधरित्या जनावरांच्या वाहतुकीचा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी त्यांनी संशयित टेम्पोचालकाला पकडून राजापूर पोलिसांकडे दिले. बाेलेराे गाडीसह आठ गाई असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस हवालदार कमलाकर पाटील, प्रमोद वाघाटे, सागर कोरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर तिघांनाही पाेलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास राजापूर पोलीस करीत आहेत.