गुहागर : तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना वर्षभरात २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील सलग तीन दिवसांमध्ये तवसाळ, अडूर व पिंपळवट (आरे) येथील तिघांचा मृत्यू झाला आहे. यामधील दोघे ७० हून अधिक वयाचे असून एक ४० वर्षीय आहे.
तालुक्यात १७ मार्च २०२० ला शृंगारतळीमध्ये जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. त्यानंतर मात्र पुढचे काही महिने इतर तालुक्यांच्या तुलनेत मिळणारी रुग्ण संख्या फारच कमी होती. वर्षभरानंतर (आजपर्यंत) तालुक्यात १ हजार १३३ एवढ्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर २२३ एवढे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामधील बहुतांशी रुग्ण गृह अलगीकरणामध्ये आहेत. वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेऊन पुन्हा एकदा वेळणेश्वर इंजिनिअरिंग कॉलेजच्या दोन इमारतींमधून कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारपासून येथे प्रत्यक्षात रुग्ण दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी देविदास चरके यांनी सांगितले.
तालुक्यात वर्षभरातील कोरोना वाढीचा वेग पाहता फारच कमी होता. शिमगोत्सवानंतर हा वेग वाढला. वर्षभरात तालुक्यात २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यावेळी गेल्या तीन दिवसांत सलगपणे तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १२ एप्रिलला पिंपळवट (आरे) येथील ७६ वर्षीय, १३ एप्रिलला तवसाळ बाबरवाडी येथील ४० वर्षीय तर १४ एप्रिलला अडूर येथील ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.