रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या सुधारित नळयोजनेची मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी मिरजोळे-पाटीलवाडी येथे रस्त्याच्या कडेला खोदलेल्या चरीमध्ये चिरे भरलेला ट्रक रुतला. त्यामुळे तब्बल तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
११.३० वाजता रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी घटनास्थळी भेट दिली. बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाने हा प्रकार घडल्याचे सांगून बांधकामच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर एका बाजुने रस्ता मोकळा करून दिल्यानंतर वाहतूक सुरू झाली.नगर परिषदेच्या सुधारित नळपाणी योजनेसाठी शीळ धरणावरून मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्याच्या एका बाजूने खोदाई करून जलवाहिन्या टाकल्या जात आहेत. खोेदाईनंतर साईडपट्टयांचे काम तातडीने करण्यासाठी बांधकाम विभागाकडे नगर परिषदेने १ कोटी १५ लाख रुपये भरपाई वर्ग केली आहे.त्यामुळे खोदाई झालेल्या भागात तातडीने दुरुस्ती करण्याची जबाबदारी असतानाही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असा ठपका नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी अधिकाऱ्यांवर ठेवला. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक रोशन फाळके, वसंत पाटील उपस्थित होते.