दापोली : तालुक्यात गेले आठ ते दहा दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मंगळवारी आसूदबाग येथे दरड कोसळून तीन घरांना धोका निर्माण झाला आहे. तहसीलदार वैशाली पाटील, मंडल अधिकारी सुदर्शन खानविलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या तीनही घरांचे पन्नास हजार रुपये नुकसान झाले आहे.
आसूदबाग येथील गणेशवाडी व येथील मुख्य रस्त्यावर दरड कोसळून अडीच फुटावर असलेल्या तीन घरांना भेगा जाऊन धोका निर्माण झाला आहे. यात सुवर्णा सुरेश माने यांच्या घराचे २५ हजार रुपये, कल्पेश गोविंद माने यांच्या घराचे २० हजार रुपये तर हरिश्चंद्र शंकर माने यांच्या घराचे ५ हजार रुपये नुकसान झाले आहे.
दरड कोसळल्यानंतर तेथील जमिनीला भेगा गेल्या तसेच अडीच फुटावर कल्पेश माने, संतोष माने, हरिश्चंद्र माने यांच्या घरांच्या जमिनीसह घराच्या भिंतींना भेगा गेल्या आहेत. त्यामुळे घरांना धोका निर्माण झाल्याने या कुटुंबांना स्थलांतरित होण्याच्या सूचना महसूल विभागाने दिल्या आहेत. रेवाळेवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तोपर्यंत या तीनही कुटुंबातील ११ सदस्यांची सध्या शिर्केवाडी येथील नातेवाईकांकडे व्यवस्था करण्यात आली आहे.