रत्नागिरी : ८० लाखांच्या दरोडा प्रकरणात अटक असलेल्या पाचजणांच्या विरोधात रत्नागिरीच्या न्यायालयात ३०० पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्विफ्ट डिझायर गाडी जप्त करण्यात आली आहे.दि. २२ मार्च २०१६ रोजी केरळ येथील एका सोने व्यापाऱ्याकडे काम करणारे श्रीराम शेडगे व विकास शिंदे हे मुबईत सोने विकून त्यातून मिळालेले ८० लाख रुपये घेऊन परत केरळला जात होते. ओखा एर्नाकुलम या गाडीत पहाटे ३.३० वाजण्याचा सुमारास दोन अज्ञातांनी आपण पोलिस असल्याची बतावणी करून त्यांना स्विफ्ट गाडीतून चिपळूणच्या दिशेने नेऊन त्यांच्याकडील ८० लाख रुपये लुटले होते. जिल्ह्यातील हा सर्वांत मोठा दरोडा होता. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू करून तीन दिवसांत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी प्रथम अमित शिवाजी शिबे याला ताब्यात घेतले.त्यानंतर मच्छींद्र कामथे, अनिल वंडुसकर, सुदर्शन भोसले, प्रकाश लोहार यांना ताब्यात घेऊन तीन दिवसांतच हा गुन्हा उघडकीस आणला. त्यांच्याकडून ८० लाखांपैकी सुमारे ७४ लाख ६२ हजार रुपये व स्विफ्ट डिझायर (एमएच १२-केएन १२९१) ही गाडी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, या पाचजणांच्या विरोधात मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात ३०० पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. (वार्ताहर)
८० लाखांच्या दरोडाप्रकरणी तीनशे पानी दोषारोपपत्र दाखल
By admin | Published: June 02, 2016 10:49 PM