देवरूख : संगमेश्वर तालुक्यात बुधवारी तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये आंगवली गावचे रहिवासी व निवृत्त पोलीस अधिकारी तसेच माभळे आणि कडवई येथील दोन ७२ वर्षीय वृद्धांचा समावेश आहे.
संगमेश्वर तालुक्यात सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. कधी रुग्णसंख्या शतक गाठत आहे, तर कधी द्विशतक गाठत आहे. १९ रोजी तर तालुक्यातील पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या २०९ एवढी होती. मंगळवारी (दि. २०) ७७, तर बुधवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार ३१ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. कोंड उमरे, माखजन, कडवई, माभळे घडशी वाडी, देवधामापूर, सायले, बुरंबी, साखरपा, दख्खन आदी परिसरातील रुग्ण आहेत.
बुधवारी तालुका आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या अहवालानुसार तालुक्यात तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यात आंगवली येथील रहिवासी असलेले आणि सहा महिन्यांपूर्वीच देवरूख पोलीस स्थानकातून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झालेले पी.डी. कदम (५९) यांचा समावेश आहे. ते तीन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आले होते. याबरोबरच माभळे घडशीवाडी एक आणि कडवई येथील एक अशा दोन बहात्तरवर्षीय वृद्धांचा समावेश आहे.