रत्नागिरी : कोरोनाच्या जेएन १ या नव्या व्हेरिएंटची चर्चा वाढत असताना रत्नागिरीत कोरोनाचे तीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे. हे जेएन १चे रुग्ण आहेत का, याची खातरजमा करण्यासाठी तिघांचेही स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत.कोविडचा ओमिक्रॉन हा व्हेरिएंट खूप प्रबळ ठरला होता. त्या कालावधीत कोरोनाने हजारो लोकांचे बळी घेतले होते. आता सर्वत्र जेएन १ या नव्या कोरोना व्हेरिएंटची चर्चा आहे. देशात त्याचे रुग्ण सापडू लागले आहेत. हा अतिधोकादायक नसला तरी लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये इतर व्हायरल आणि विषाणूंचे संसर्ग वाढत असतात. त्यामुळे या नव्या व्हेरिएंटबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे.
रत्नागिरी तालुक्यातील कसोप, तोणदे आणि राजिवडा येथे कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. हे रुग्णांना जेएन १ या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग झालेला नाही ना, याची खात्री करण्यासाठी त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत.कोविड सेंटर सुरूदेशात जेएन१चे रुग्ण वाढू लागल्यानंतर राज्य सरकारने सर्व प्रशासनाना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोविड सेंटर सुरू करण्यात आली आहेत. शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये हे नवे तिन्ही रुग्ण डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
स्वॅब पुण्याला पाठवणाररत्नागिरी तालुक्यात सापडलेले कोरोनाचे तिन्ही रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये दाखल आहेत. यामध्ये एक महिला आणि दोन पुरुष रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णांमध्ये जेएन १ या नवा व्हेरिएंटची तपासणी करण्यासाठी त्यांचा स्वॅब पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणेने हालचाल सुरू केली आहे.
नागरिकांना सूचना
- गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा.
- खोकताना किंवा शिंकगताना तोंडावर हात धरा.
- आपले हात नियमित स्वच्छ करा. सॅनिटायझरचा वापर करा.
- कोविड आणि फ्लू लसीकरणाच्या बाबतीत अपडेट राहा.
- आजारी असल्यास घरी विश्रांती घ्या.
- तुम्हाला लक्षणे आढळल्यास चाचणी करा.