खेड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महामार्गावरील कशेडी घाटातील पोलीस नाक्यावर जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कडक तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीदरम्यान मुंबईहून रत्नागिरीत येताना बनावट ई-पासचा वापर करून प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरीतील तिघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महम्मद वसीम रफीक लालू (रा. उद्यमनगर, रत्नागिरी), तन्वीर खुदबु काझी (रा. कोकणनगर, रत्नागिरी), अजीम मंगा (रा. उद्यमनगर, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही घटना ३० एप्रिल रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजण्याच्या सुमाराला घडल्याचे पोलीस कॉन्स्टेबल अविनाश टेमकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
महम्मद लालू व तन्वीर काझी हे एमएच ०४, जीजे ४९९५ या क्रमांकाच्या झायलो गाडीने मुंबईहून रत्नागिरीकडे येत होते. कशेडी घाटातील तपासणी नाक्यावर त्यांची कार थांबवून तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे ई-पासबाबत पोलिसांनी विचारणा केली. हे दाेघे काहीतरी लपवत असल्याचा संशय आला. त्याचबराेबर या ई-पासवरील अक्षरे लहान - माेठी असल्याचे निदर्शनाला आले. त्यांच्याकडील ई-पासबाबत सायबर क्राईम शाखेत खातरजमा करण्यात आली. त्यानंतर हा ई-पास बनावट असल्याचे उघड झाले. यावेळी पाेलिसांनी त्यांना ई-पासबाबत विचारणा केली असता, हा पास अजीम मंगा यांनी बनवून दिल्याचे सांगण्यात आले. पाेलीस अधीक्षक कार्यालयाच्या लाेगाेचा गैरवापर केल्याचे पाेलीस तपासात सिद्ध झाले. त्यानुसार तिघांवर भारतीय दंड विधान कलम ४२०, ४६८, ४७१, २६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नीशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैशाली आडकुर अधिक तपास करत आहेत.