रत्नागिरी : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यासोबत मगर, साप, अजगर व इतर वन्यप्राणी पाण्यासोबत वाहून आल्याची शक्यता असल्याने त्यांचा बचाव करण्यासाठी रत्नागिरी (चिपळूण) वनविभागाची ३ बचाव पथके बचाव साहित्यासह २४ तास शहरात सज्ज आहेत. सध्या पुराचे पाणी ओसरल्याने चिपळूण शहरामध्ये किंवा आसपासच्या शहरात वन्य प्राणी आढळू लागले आहेत. या प्राण्यांचा बचाव करण्यासाठी वन विभागाची ३ बचाव पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. असे प्राणी आढळल्यास वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर किंवा चिपळूण कार्यालयातील नियंत्रण कक्षावर संपर्क साधावा, असेे आवाहनही वनविभागाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांचे फोन येताच वनविभागामार्फत संबंधित ठिकाणी तत्काळ मदत केली जात आहे. राजश्री किर वनक्षेत्रपाल चिपळूण ९४०४९०५८५, राजाराम शिंदे वनरक्षक कोळकेवाडी (९७६५७८७५७८), निलेश बापट, मानद वन्यजीव रक्षक चिपळूण (९५५२५९३८९८), दत्ताराम सुर्वे, वनरक्षक रामपूर (८८८८९६७२८४) यांच्या क्रमांकावर संपर्क साधावा. मानवी वस्तीत वन्यप्राणी आल्यास नागरिकांनी घाबरुन न जाता तत्काळ वनविभागास संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.
२५५ वन्यजीवांची सुटका...
वनविभाग चिपळूण मार्फत २०२० -२१ मध्ये २५५ वन्यजीवांची सुटका करुन त्यांना जीवदान दिले आहे. वनविभागाची पथके चिपळूण शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन संकटात सापडलेले, मानवी वस्तीत आलेले वन्यप्राणी यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम करीत आहेत. २२ जुलैपासून आतापर्यंत ६ नाग, ३ घोणस, ४ अजगर, २ मण्यार, १ बिबट्या (राजापूरमधून) असे एकूण १६ वन्यप्राण्यांचा बचाव करण्यात आला आहे.