जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खालगाव, राई, चवे गावांमध्ये चार दिवसापूर्वी आलेल्या वादळी पावसाने या भागातील डोंगर-उतारावरील काही विद्युत खांब उन्मळून पडल्याने तर काही भागात विजांच्या तारा तुटून पडल्याने खालगाव, राई, चवे या तीन गावांमध्ये गेले चार दिवस वीजप्रवाह पूर्णतः खंडीत झाल्याने ही तिन्ही गाव अंधारात आहेत.
जाकादेवी खालगाव परिसरातही वादळी पावसाने विद्युत खांब उन्मळून पडले होते, मात्र या भागातील वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन जाकादेवी खालगाव भागात २ ते ३ दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत केला. चवे, राई, खालगाव भागात पडलेले विद्युत खांब व तुटलेल्या तारा जोडण्याचे काम वायरमनने सुरू केले असले तरी डोंगर -उतार व जंगलमय भाग लक्षात घेता या भागात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात विलंब होत आहे. तरीही विद्युत खात्याचे कर्मचारी दहा दहा -बारा बारा तास ऊन पावसामध्ये तर कधी रात्री उशिरापर्यंत काम करत आहेत. ग्रामस्थही मदत करताना दिसत आहेत.