रत्नागिरी : समुद्र स्नानाचा आनंद लुटण्यासाठी पोहायला गेलेले तीन तरुण बुडाले. यातील दोघांना वाचवण्यात यश आले असून, एकजण बेपत्ता झाला आहे. हे तिघेही मूळचे बिहारचे राहणारे आहेत. ही घटना रत्नागिरीतील पांढरा समुद्र येथे काल, सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.सोमवारी, १५ ऑगस्टनिमित्त सर्व आस्थापना बंद होत्या. फिनोलेक्स कॉलनी शेजारी कोस्टगार्डच्या रहिवासी इमारतीचे काम सुरू आहे. याठिकाणी मजूर म्हणून कामाला असलेले तीन तरुण समुद्र स्नानाचा आनंद लुटण्यासाठी पांढरा समुद्र येथे गेले होते. मद्यधुंद अवस्थेत हे तरुण समुद्राच्या पाण्यात सेल्फीसह व्हिडिओ चित्रीकरण करण्यात दंग झाले होते. एक तरुण मोबाईलवर चित्रीकरण करीत होता, तर दोघेजण मद्यधुंद अवस्थेत समुद्रात लाटांवर उड्या मारत होते. त्यातील एकजण पाण्यात ओढला गेला आणि अचानक गायब झाला. तो बुडत असताना काही ग्रामस्थांनी दुरून पाहिले. मात्र, ते समुद्रकिनारी पोहोचेपर्यंत फार उशीर झाला होता.मुरुगडा परिसरातील ग्रामस्थांनी समुद्रावर धाव घेऊन दोघांना पाण्यातून बाहेर काढले. त्यातील अमन खान तरुण नशेमध्ये फार बेधुंद झाल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. त्याच्या शेजारी असलेला त्याचा सहकारी अमीर खान हा कधी बेपत्ता झाला हे त्याला कळलेच नाही. अमन बरोबर असणाऱ्या आणखी एकाला ग्रामस्थांनी वाचविले.ग्रामस्थांनी त्यांची विचारपूस सुरू केली असता फिनोलेक्स कॉलनी शेजारी कोस्ट गार्डच्या रहिवासी मातीचे बांधकाम करत असल्याचे सांगितले. त्याचठिकाणी राहत असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबतची माहिती तात्काळ शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.समुद्रात पोहण्यासाठी आलेले हे तिघेही तरुण मूळचे किशनगंज बिहारचे असून, सध्या ते रत्नागिरीत वास्तव्याला आहेत. या घटनेची माहिती त्यांच्या ठेकेदाराला देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, समुद्रात बेपत्ता झालेला आमिर खान याचा शोध सुरू असून, त्याबाबतची नोंद शहर पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.
रत्नागिरी: नशेत बेधुंद, समुद्रात पोहायला गेलेले तीघे तरुण बुडाले; दोघांना वाचविण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 11:32 AM