भय, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून भाजपचे ‘घाणेरडे कृत्य ऑपरेशन लाेटस’ - नाना पटाेले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 01:16 AM2023-07-04T01:16:16+5:302023-07-04T01:17:23+5:30
महाराष्ट्राची जनता त्यांना जागा दाखविल्याशिवाय शांत बसणार नाही, असे मत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी : भाजपचे कृत्य सर्वांना कळलेले आहे. भाजपने २ भाग पाडलेले आहेत. भय आणि भ्रष्टाचार त्या माध्यमातून घाणेरडे ‘कृत्य ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून केले जात आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात जे पाप घडले आहे. त्याचे परिणाम भाजपला येणाऱ्या काळात भोगावे लागतील. महाराष्ट्राची जनता त्यांना जागा दाखविल्याशिवाय शांत बसणार नाही, असे मत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.
काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले साेमवारी (३ जुलै) रत्नागिरी दाैऱ्यावर आले हाेते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाना पटाेले म्हणाले की, जे कोणी काँग्रेसबरोबर उभे असतील त्यांना सोबत घेऊन चालू, ही काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टींमध्ये भाजपने जया पद्धतीचे कार्य केलेले आहे. हे आता सर्वांना कळत आहे. भाजपचे राजकारण काय असते हे जनतेला कळलेले आहे. देशातील सरकारने संविधानिक व्यवस्थेचे तीन तेरा वाजवलेले आहेत असेही ते यावेळी म्हणाले.
तसेच ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा यांची चाचणी काँग्रेस करत आहे. महाराष्ट्रातील मूळ पक्ष काँग्रेसच, ही चाचणी आम्ही लपून नाही तर जाहीरपणे करतो आहोत. तसेच मित्रपक्षालाही ताकद देण्याचे काम आम्ही करू, असे नाना पटोले यावेळी म्हणाले. दरम्यान, काँग्रेस पक्षात कुठली भीती नाही, त्यामुळे आम्हाला काही घाबरण्याचे कारण नाही. आमच्या पक्षात फूट पडेल असे मला वाटत नाही, असेही नाना पटोले म्हणाले.
महाविकास आघाडी कायम राहील. विरोधी पक्षनेते संदर्भात बसून निर्णय होईल, आत्तापासून आततायीपणा राष्ट्रवादीने करू नये, असा सल्ला नाना पाटोले यांनी यावेळी दिला.