लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शासनाने १ मे पासून मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. यासाठी ई पाॅस मशीनवर लाभार्थ्याचा अंगठा लावणे सक्तीचे करण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या सद्यस्थितीत ही यंत्रणा कोरोनासाठी निमंत्रक असल्याने रेशन दुकानदारांनी याला तीव्र विरोध दर्शवीत धान्य वितरण न करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर दुकानदारांची ही मागणी मान्य करीत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा प्रशासनाने ई पाॅस मशीनद्वारे धान्य वितरण न करता केवळ दुकानदाराच्या अंगठ्याने धान्य वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दुकानदारांची ही मागणी मान्य झाल्याने आता लवकरच याप्रकारे धान्य वितरित होणार आहे.
राज्यात मार्च २०२१ पासून कोविड-१९ ची दुसरी लाट आली आहे. या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देत प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता केंद्र सरकारनेही मे आणि जून हे दोन महिने धान्य मोफत देण्याची घोषणा केली असून त्यादृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे.
या योजनेचा लाभ एकूण ११ लाख २६ हजार १५५ सदस्यांना मिळणार आहे. मात्र त्यासाठी लाभार्थ्याच्या अंगठ्याचा ठसा ई पाॅस मशीनवर घेणे बंधनकारक केले होते. मात्र, हे कोरोनाचा संसर्ग वाढविणारे असल्याने दुकानदारांनी विरोध केला होता. मात्र, ही मागणी मान्य झाल्याने धान्य वाटपातील अडथळा दूर झाला आहे.
ई पाॅस मशीनवर दुकानदार आणि ग्राहकांचे ठसे घेऊन वाटप होते. अशा स्वरूपाचे वाटप म्हणजे कोरोनाला निमंत्रण असल्याने त्याऐवजी केेवळ दुकानदाराचे ठसे घेऊन धान्याचे वितरण व्हावे, ही मागणी अखेर मान्य झाली.
लाभार्थ्यांपर्यंत धान्य....
शासनाच्या निर्णयानुसार मोफत धान्य देताना कुठल्याही लाभार्थ्यावर अन्याय होणार नाही, याबाबत दुकानदारांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. पाच महिन्यात धान्य अनियमित असलेल्या ग्राहकावर विशेष लक्ष ठेवावे. कोरोना काळात विलगीकरणात असलेल्या कुटुंबाचे धान्य त्याच्या वेळेनुसार वितरित करण्याच्याही सूचना आहेत.
धान्य वाटपात पारदर्शकता असावी, यासाठी शासनाने ई-पाॅस मशीनद्वारे वितरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, सध्या कोराेनाचा संसर्ग पाहता आता पावतीद्वारे सध्या तरी वितरण सुरू करण्यात आले आहे.
- ऐश्वर्या काळुसे, प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी