आॅनलाईन लोकमतरत्नागिरी, दि. २२ :जिल्ह्यातील पाटबंधारे विभागांच्या अंतर्गत येणाऱ्या ६१ लघू व २ मध्यम अशा एकूण ६३ धरण प्रकल्पांपैकी ३५ धरणांमध्ये शंभर टक्के पाणी साठा झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी १० धरणे येत्या आठवड्यात पूर्ण भरण्याची शक्यता आहे. २० जुलैपर्यंत सर्व धरणांमध्ये ३५९ .०८ दशलक्ष घनमीटर अर्थात ८०.८२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. पूर्ण भरलेल्या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पावसाअभावी भात लावणीचे काम रखडले होते. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भात लावणीचे कामही सुरू झाले आहे. जिल्ह्यातील सिंचनासाठी साठवण होत असलेल्या धरणांमध्येही साठा कमी होता. मात्र दमदार पाऊस सुरू झाल्यानंतर २० जुलैपर्यंत जिल्ह्यातील ६३ पैकी ३५ धरणे तुडुंब भरली असून, सांडव्यावरून पाणी वाहून जात आहे. रत्नागिरी शहराची पाण्याची मदार असलेल्या शीळ धरणातही शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. अतिरिक्त पाणी सांडव्यावरून वाहात आहे. या वर्षभरात रत्नागिरीच्या सुधारित पाणी पुरवठा योजनेचे काम होणार आहे. त्यामुळे शीळ धरणातील या पाणीसाठ्यातून रत्नागिरी शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तालुकानिहाय शंभर टक्के भरलेली धरणे याप्रमाणे : मंडणगड ३, दापोली ४, खेड २, गुहागर १, चिपळूण ८, संगमेश्वर ५, रत्नागिरी १, लांजा ८ आणि राजापूर ३ यांचा समावेश आहे.
जोरदार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील निम्मी धरणे तुडुंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 5:06 PM