राजापूर : तालुक्यातील ओणी ग्रामपंचायतीच्या मनमानी आणि अनागोंदी कारभारामुळे व प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे भर पावसाळ्यात ओणी तोरणभाटी परिसरातील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याचा आरोप ओणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य शौकत हाजू यांनी केला आहे. नळपाणीपुरवठा योजनेद्वारे पुरविण्यात येणाऱ्या या दूषित पाण्यामुळे या परिसरात साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुढील दोन दिवसात जर का ग्रामस्थांना शुध्द पाणीपुरवठा करण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही केली नाही तर थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी यांना घेराओ घालण्याचा इशारा हाजू यांनी दिला आहे.ओणी ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळेच आज नळपाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडाला आहे. जलस्वराज्य योजनेसह पाणलोट कार्यक्रमांतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही हाजू यांनी केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणीही हाजू यांनी केली आहे. याबाबत सोमवारी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.ओणी - तोरणभाटी परिसरात गेले चार ते पाच दिवस दूषित गढूळ गाळ आणि घाण मिश्रीत पाण्याचा पुरवठा होत आहे. या भागासाठी असणाऱ्या नळपाणीपुरवठा योजनेच्या विहिरीलगतच असलेल्या पऱ्याचे पाणी या विहिरीत आले आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतीने नुकतेच खोदकाम करून विहिरीतील पाणी वाढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, यात विहिरीतील पाणी शुध्दीकरण फिल्टरची नासधूस झाली. तर खोदकामामुळे या ओहोळातील दूषित पाणी थेट विहिरीत जात आहे. त्या पाण्याचा या परिसरातील ग्रामस्थांना पुरवठा केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांना हेच दूषित पाणी प्यावे लागत असून, ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे हाजू यांनी नमूद केले आहे.या प्रकरणी सोमवारी आपण गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थितीची माहिती दिली, दूषित पाण्याचे नमुनेही सादर केले. मात्र, त्यांच्याकडून कोणतेही ठोस उत्तर देण्यात आलेले नाही. पुढील दोन दिवसात ग्रामस्थांना शुध्द पाणीपुरवठा करण्याबाबत प्रशासनाकडून कार्यवाही झाली नाही, तर हेच दूषित पाणी घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराओ घालण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)ओणी नळपाणी पुरवठा योजनेद्वारे ओणी-तोरणभाटी परिसरातील ग्रामस्थांना केला जात असलेल्या पाणीपुरवठ्याचे पाणी दूषित आहे, हे खरे आहे. याप्रकरणी ओणी ग्रामसेवकांना तत्काळ बोलावून या पाणी शुध्दीकरणाबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, पुढील दोन दिवस ग्रामस्थांनी पाणी पिऊ नये, असे फलक लावावेत व तत्काळ घरोघरी मेडीक्लोअरचे वाटप करावे, असे आदेश दिले आहेत.- जयेंद्र जाधव, गटविकास अधिकारी
ओणीतील ग्रामस्थांवर दूषित पाणी पिण्याची वेळ
By admin | Published: June 16, 2015 11:26 PM