रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना तीन वर्षांनंतर मुहूर्त मिळाला असून, त्याची प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपासून राबविण्यात येणार आहे तर ५ जानेवारी २०२३ रोजी शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून बदलीचे आदेश देण्यात येणार आहे.जिल्ह्यात २,५८८ प्राथमिक शाळा असून, त्यामधील सुमारे ७३,५०० विद्यार्थ्यांना ६ हजार शिक्षक अध्यापनाचे धडे देत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या रखडल्या होत्या. कारण मागील दोन वर्षांत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षक बदल्या करण्यात आलेल्या नाही. मात्र, शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही बदली प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपासून सुरू होत असून, सुरुवातीला दुर्गम भागातील शाळांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील दोन महिने ही बदल्यांची प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे दीपावलीच्या सुटीनंतर जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरील शिक्षण विभागामध्ये शिक्षकांची वर्दळ वाढणार आहे.गतवेळपेक्षा यावर्षी कमी शिक्षकांच्या बदल्यासन २०१९ मध्ये प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या हाेत्या. त्यावेळी ३,५०० शिक्षकांच्या बदल्या शिक्षण विभागाने केल्या होत्या. मात्र, त्यानंतर आता शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. तीन वर्षापूर्वीच्या कमी शिक्षकांच्या बदल्या यंदा करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दुर्गम भागांतील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना सुगम भागांतील शाळांमध्ये येण्याची संधी उपलब्ध होणार आहे.जागा भरण्यासाठी राऊंडशिक्षकांचे बदलीसाठी ५ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यात येणार आहेत. त्यानंतर ९ रोजी विशेष संवर्ग १ व २ मधील शिक्षकांच्या याद्या जाहीर करण्यात येणार असून, १० रोजी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तर १३ रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आक्षेप असल्यास शिक्षकांना अपिल करता येणार आहे. उर्वरित प्रक्रियेसाठी सुमारे महिन्याचा कालावधी जाणार असून, २९ डिसेंबरला १० वर्षे सुगम क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ३० रोजी अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी राऊंड घेण्यात येणार आहे.शाळांची यादीसुगम आणि अवघड क्षेत्रातील शाळांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाले होते. अवघड क्षेत्राची यादी चुकीची असल्याचा आरोप शिक्षकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हांतर्गत बदल्या रखडल्या होत्या. मात्र, ३१ ऑक्टोबरला जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील ६८६ शाळांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्याच दिवशी बदली पात्र आणि बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या याद्या जाहीर करण्यात येणार आहेत.
रत्नागिरी: तीन वर्षानंतर शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 12:57 PM