लाेकमत न्यूज नेटवर्क
असगोली : वाढत्या काेराेनाच्या संख्येमुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत पोलिसांना ॲक्शन मोडमध्ये येऊन कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिल्या. विनाकारण काेणीही बाहेर पडू नये असे आवाहन करूनही नागरिक बाहेर पडत आहेत, हे पाेलिसांच्या कारवाईवरून दिसत आहे. गुहागर पोलिसांनी ३ दिवसांत ९३ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करीत २९,५०० रुपयांची दंड वसुली केली आहे.
कडक निर्बंधाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ३ जून राेजी पोलिसांनी ६४ जणांवर कारवाई करून २३,१०० रुपयांचा दंड वसूल केला. यामध्ये मोटार वाहन कायद्याप्रमाणे ४३ लोकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १०,६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आरटीपीसीआर तपासणी न करता सेवा पुरविणाऱ्या ४ लोकांवर प्रत्येकी १ हजारप्रमाणे ४ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई पोलिसांनी केली आहे. तर मास्क न लावता फिरणाऱ्या १७ लोकांकडून ५०० रुपयांप्रमाणे ८,५०० रुपयांचा दंड वसूल केला. तसेच ४ जूनला तालुक्यात विनाकारण फिरणाऱ्या १४ लोकांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये १३ लोकांवर मोटर वाहन अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली. त्यातून २,९०० रुपयांची दंड वसुली पोलिसांनी केली. तर एका व्यक्तीकडून मास्क नसल्याबद्दल ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. शनिवार, ५ जून राेजी संचारबंदी मोडून फिरणाऱ्या १५ जणांवर मोटर वाहन अधिनियमाप्रमाणे कारवाई करून ३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.