राजापूर :
राज्याचे परिवहनमंत्री हेच रत्नागिरीचे पालकमंत्री असतानाच राजापूर आगारात टायर उपलब्ध नसल्याने सुमारे अकरा एस. टी. च्या गाड्या बंद आहेत. त्याचे तीव्र पडसाद राजापूर पंचायत समितीच्या मासिक सभेत उमटले. शिवसेनेच्या सदस्यांनी या मुद्द्यावरुन प्रश्न उपस्थित केले. परिवहनमंत्र्यांनी टायर उपलब्ध करून द्यावेत, असा ठराव मासिक सभेत करण्यात आला.
राजापूर पंचायत समितीची मासिक सभा सभापती प्रमिला कानडे यांच्या अध्यक्षतेखाली येथील पंचायत समितीच्या किसान भवनात पार पडली. त्यावेळी गटविकास अधिकारी सागर पाटील, सहायक गटविकास अधिकारी तेजश्री आवळे, पंचायत समिती सदस्यांसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील धोकादायक शाळा या विषयावर सदस्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. धोकादायक शाळांचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे तालुक्यातील रायपाटण येथील खापणे महाविद्यालयाचे बंद स्थितीत असलेले कोविड सेंटर अद्यापही बंद आहे. त्याबद्दल सदस्य अभिजित तेली यांनी प्रश्न उपस्थित केला. तालुक्यात पूर्व व पश्चिम परिसरात दोन ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात यावेत, अशी मागणी अभिजित तेली यांनी केली. धोपेश्वर गावच्या ग्रामसेवकांच्या कार्यपद्धतीवर माजी सभापती सुभाष गुरव यांनी सभागृहात तीव्र नापसंती व्यक्त करत त्यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी केली. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्याकडे जिल्हा परिषदेमधील अतिरिक्त कार्यभार असल्याने ते राजापूरसाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील कामे रखडली असून, त्यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार रद्द करावा, अशी मागणीही सदस्यांनी केली.