रत्नागिरी - चिपळूणमधील तिवरे धरणाला भगदाड पडल्यामुळे धरण फुटल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 24 जण बेपत्ता झाले असून दुर्घटनेतील सहा जणांचे मृतदेह हाती लागल्याची गिरीश महाजन यांनी माहिती दिली आहे.
तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत नागरिकांनी तक्रार केली होती अशी कबुली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली, लीकेज असताना स्थानिकांना तक्रार दिली होती तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. अधिकाऱ्यांनी दुरुस्ती केली होती असा दावा केला आहे. त्यामुळे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती गिरीश महाजनांनी दिली. रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर हे काही तासात घटनास्थळाची पाहणी करणार आहे. रात्री ही घटना घडली आहे. तिवरे धरणाला तडा गेल्याने ही दुर्घटना घडली. याबाबत स्थानिकांनी याआधीच तक्रार केली होती मात्र त्याकडे ज्यांनी दुर्लक्ष केले त्यांच्यावर योग्य ती कारवाई नक्कीच केली जाईल. मी घटनास्थळासाठी रवाना झालो आहे असं वायकरांनी सांगितले.
ताज्या माहितीनुसार घटनेतील 6 जणांचा मृतदेह हाती लागला आहे मात्र परिसरातील अनेक लोक भयभीत अवस्थेत आहेत. पाण्याचा प्रवाह कमी झाला असला तरी या धरणाचं पाणी ज्या नदीत गेलं आहे त्या नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावकऱ्यांनाही धोक्याचा इशारा दिला आहे.
शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट दिली. मागील चार-सहा महिन्यापासून स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला याची माहिती दिली होती. मात्र अधिकाऱ्यांनी काम करताना निष्काळजीपणा केला गेला. स्थानिकांनी सांगूनही दुर्लक्ष केले गेले त्यामुळे या घटनेला जबाबदार प्रशासन आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
या दुर्घटनेतील बेपत्ता असलेल्या लोकांची नावे
अनंत हरिभाऊ चव्हाण (63)अनिता अनंत चव्हाण (58)रणजित अनंत चव्हाण (15)ऋतुजा अनंत चव्हाण (25)दुर्वा रणजित चव्हाण (1.5)आत्माराम धोंडू चव्हाण (75)लक्ष्मी आत्माराम चव्हाण (72)नंदाराम महादेव चव्हाण (65)पांडुरंग धोंडू चव्हाण (50)रवींद्र तुकाराम चव्हाण (50)रेश्मा रविंद्र चव्हाण (45)दशरथ रविंद्र चव्हाण (20)वैष्णवी रविंद्र चव्हाण (18)अनुसिया सीताराम चव्हाण (70)चंद्रभागा कृष्णा चव्हाण (75)बळीराम कृष्णा चव्हाण (55)शारदा बळीराम चव्हाण (48)संदेश विश्वास धाडवे (18)सुशील विश्वास धाडवे (48)रणजित काजवे (30)राकेश घाणेकर (30)