रत्नागिरी : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी पाचव्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी एकूण चार, तर जिल्ह्यात नगरसेवकपदासाठी तब्बल ९८ अर्ज दाखल करण्यात आले. रत्नागिरीतील नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून राहुल पंडित यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. अंतिम उमेदवारी याद्या तयार करण्याचे काम शुक्रवारीही सुरू असल्याने आज, शनिवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अधिकच गर्दी होण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत शुक्रवारी नगराध्यक्षपदासाठी एक आणि नगरसेवकपदासाठी २९ अर्ज दाखल करण्यात आले. आतापर्यंत नगराध्यक्षपदासाठी पाच आणि नगरसेवकपदासाठी ५२ अर्ज दाखल झाले आहेत. चिपळुणात शुक्रवारी नगराध्यक्षपदासाठी एक आणि नगरसेवकपदासाठी १३ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत नगराध्यक्षपदासाठी एक आणि नगरसेवकपदासाठी १५ अर्ज आले आहेत. खेडमध्ये नगराध्यक्षपदासाठी दोन आणि नगरसेवकपदासाठी २५ अर्ज दाखल झाले आहेत गुरुवारपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नव्हता. दापोली नगर पंचायतीमध्ये शुक्रवारी १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. राजापुरात शुक्रवारी काँग्रेसकडून ५, भाजपकडून ९ तर राष्ट्रवादीकडून एक व अपक्ष एक अशा १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून रवींद्र बावधनकर यांचेकडून अर्ज दाखल करण्यात आला. आज शनिवार अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. काही पक्षांचे अंतिम यादीचे काम आजही सुरूच होते. त्यामुळे आज, शनिवारी पक्षांतर आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याला अधिकच गती येणार असल्याचे स्पष्ट आहे. (प्रतिनिधी)
अर्ज भरण्यासाठी आज उडणार झुंबड
By admin | Published: October 28, 2016 11:09 PM