रत्नागिरी : मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्यापासून (बुधवार) अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरूवात होणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी यावर्षी पहिल्यांदाच आॅनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज भरावे लागणार आहेत.जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगूल वाजल्याने आता जिल्हा प्रशासन निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांत कार्यालयाच्या ठिकाणी प्रांताधिकारी, तर अन्य तालुक्यांमध्ये तहसीलदार यांची सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.गेल्या वर्षीपासून उमेदवारांना निवडणुकीसाठी आॅनलाईन अर्ज भरणे राज्य निवडणूक आयोगाकडून अनिवार्य करण्यात आले. त्यामुळे आता सर्वच निवडणुकांसाठी उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना आॅनलाईन अर्ज भरावे लागत आहेत. जिल्हा परिषदेची २०१२ सालानंतर आता पाच वर्षांनंतर यावर्षी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यामुळे आता या निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आॅनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. बुधवार, १ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होत आहे. १ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत इच्छुकांना सकाळी ११ ते २ या वेळेत आॅनलाईन अर्ज भरून त्याची प्रिंट दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार आहे. ज्या ठिकाणी उपविभागीय कार्यालये आहेत, त्या ठिकाणी तेथील उपविभागीय अधिकारी अर्ज स्वीकारणार आहेत, अन्य ठिकाणी तहसीलदार अर्ज स्वीकारणार आहेत. ७ रोजी अर्जांची छाननी होणार आहे. बुधवारी आॅनलाईन अर्ज भरण्याचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाचा मुहूर्त कोण कोण साधणार, याबाबत उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)
मिनी मंत्रालयासाठी आजपासून रणसंग्राम
By admin | Published: February 01, 2017 12:33 AM