गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू मंदिरात मंगळवार, २७ जुलै रोजी होणारा अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्तचा उत्सव काेराेनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.
गणपतीपुळे येथे अंगारकी संकष्टी चतुर्थीला यात्रा भरते. या यात्रेसाठी घाटमाथ्यावरील कोल्हापूर, सांगली, मिरज, सातारा, बेळगाव, इचलकरंजी, इस्लामपूर, सोलापूर, कराड, जत या भागातून सुमारे ८० ते ९० हजार भाविक गणपतीपुळेत दाखल होतात. समुद्रकिनारी सायंकाळी फटाक्यांची आतषबाजी केली जाते. तसेच मंदिर परिसर, बीच, मोरया चौक व दोन्ही रस्ते विविध दुकानांनी सजलेले असतात. यात्रेमुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झालेला असताे. कोरोनाच्या महामारीमुळे राज्यातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी कोविड १९ प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत. त्यानुसार सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. या आदेशानुसार मंगळवारी होणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी व यात्रा उत्सव रद्द करण्यात आला. तसेच या दिवशी मंदिर बंद राहणार आहे. भक्त, पर्यटक व परिसरातील ग्रामस्थांनी संस्थान श्रीदेव गणपतीपुळेला सहकार्य करावे, असे आवाहन संस्थान श्रीदेव गणपतीपुळे पंचकमिटी व सचिव प्राध्यापक विनायक राऊत यांनी केले आहे.