दापोली : तालुक्यातील उटंबर, केळशी, आशापुरा बॉक्साईट मायनिंगविरोधातील सुनावणी गुरुवारी प्रांत कार्यालयात होणार आहे. पर्यावरण व आरोग्य विभागाचा अहवाल कंपनीला अनुकूल असल्याने होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सुनावणीने कंपनीचे भवितव्य ठरणार असून, यासाठी प्रांताधिकाऱ्यांचा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गेली ८ वर्षे बॉक्साईट उत्खननाचे काम करणाऱ्या या कंपनीला अचानक विरोध झाल्याने कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पुढील चौकशी होईपर्यंत कंपनी बंद ठेवण्याचे आदेश दापोली प्रांताधिकारी जयराम देशमुख यांनी दिले होते. कंपनीच्या उत्खननामुळे प्रदूषण होऊन पर्यावरणाची हानी होत असल्याची तक्रार इम्तियाज हलदे यांनी दिली होती. त्यांच्या तक्रारीमुळे कंपनीला अचानक विरोध झाला. कंपनीच्या विरोधाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्नसुद्धा झाला. कंपनीमुळे पर्यावरणाची हानी होऊन लोकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रारही करण्यात आली, त्यामुळे कंपनीच्या अडचणीत वाढ झाली. कंपनी जगली पाहिजे, असा एक मतप्रवाह आता निर्माण झाला आहे. कंपनीला होणारा विरोध स्वार्थापोटी असल्याची टीकासुद्धा होऊ लागली आहे. ज्या लोकांनी आजपर्यंत कंपनीचे ठेके घेतले, त्यानीच आता कंपनीला वेठीला धरले आहे. कंपनीवर उदरनिर्वाह करणारे मजूर व लघुउद्योजकांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून कंपनी लवकर सुरु करण्याची मागणी केली होती, तर दुसरीकडे काही लोकांनी कंपनीला विरोध दर्शवला होता. त्यामुळे कंपनीच्या वादात दोन मतप्रवाह पंचक्रोशीत पाहायला मिळाले. कंपनीशी काहीही संबंध नाही, अशा लोकांनीही विरोधी भूमिका घेतली आहे. कंपनीमुळे प्रदूषण होऊन क्षयरोगाची लागण झाल्याची तक्रार करण्यात आली होती. परंतु क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले नाहीत. तसेच धुळीने प्रदूषण झाल्याचे आढळून आले नसल्याचा अहवाल दिल्यास पर्यावरण व आरोग्य विभागाच्या अहवालावरून कंपनी पुन्हा करण्याची परवानगी मिळू शकते. आशापुरा कंपनीकडे सर्व प्रकारच्या लोकांना रोजगार देण्याची क्षमता आहे, असे बोलले जात आहे. कंपनीमुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल व लोकांना रोजगार मिळत आहे, असे असताना कंपनी बंदचा अट्टाहास का, असा सवाल काही लोक करत आहेत.त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या सुनावणीकडे साऱ्या तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
‘आशापुरा मायनिंग’ची आज सुनावणी
By admin | Published: April 20, 2016 10:21 PM