चिपळूण : नगर परिषद हद्दीमध्ये शासनाचे जलसंपदा विभागाकडून निळी व लाल पूररेषा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कामाला तातडीने स्थगिती देण्यात यावी. या पूररेषा निश्चितीसाठी शहरामध्ये फेरसर्वेक्षण करणे व इतर उपाययोजना करण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी गुरुवारी २३ रोजी रोजी सायंकाळी ४ वाजता चिपळूण नगर परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.
सध्या शहरात निळ्या व लाल पूररेषेविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. जलसंपदा विभागाने निश्चित केलेली पूररेषा शहराच्या विकासाला प्रतिबंध ठरणार आहे. याविषयी नगर परिषदेमार्फत शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे, तसेच या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेचीही सभा होणार आहे. या सभेत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे शहरातील व्यापारी, बांधकाम व्यावसायिक व नागरिकांचे लक्ष लागले आहे.