अडरे : वन विभाग, रत्नागिरी (चिपळूण) आणि मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘चिपळूणच्या पक्षी वैभवातील महत्त्वाच्या नोंदी’ या विषयावर ५ जून राेजी सायंकाळी ५ ते रात्री ८ यावेळेत वेबिनार आयाेजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने चिपळूणच्या पक्षी वैभवातील महत्त्वाच्या नोंदींतर्गत अभ्यासकांना आलेल्या अनुभवांची मांडणी केली जाणार आहे.
मागील काही वर्षात चिपळूण शहराच्या भौगोलिकतेत झालेल्या बदलांमुळे पक्ष्यांचे भ्रमणमार्ग, त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, त्यांची वस्तीस्थाने यात बदल होत आहे. ईगल, हॉर्नबिल यासारखे पक्षी वर्षानुवर्षे एकत्र जोडीने राहत असत. मात्र, आता त्यांच्यात गर्भधारणा (ब्रीडिंग) करावी की नाही, अशी मानसिकता निर्माण झाल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. निसर्ग डायरी कशी लिहायची, या विषयावर गेली पंधरा वर्षे निसर्ग डायरीतील नोंदी करणारे प्रा. डॉ. हरिदास बाबर हे मार्गदर्शन करणार आहेत. ‘पक्ष्यांची फोटोग्राफी’ या विषयावर नयनीश गुढेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. जातीने एकापेक्षा अधिक दिसणाऱ्या पक्ष्यांचे वैज्ञानिकदृष्ट्या त्यांचे अचूक विस्तृत वर्गीकरण कसे करायचे, याविषयी डॉ. श्रीधर जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत.
चिपळूणच्या पक्षी वैभवातील महत्त्वाच्या नोंदी समजून घेण्याची इच्छा असलेल्या सर्व पर्यावरण आणि पक्षीप्रेमी जिज्ञासूंनी http://meet.google.com/mic-gvbg-ocp ह्या लिंकद्वारे या वेबिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरीचे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांनी केले आहे.